
बीड प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी जीव देणाऱ्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदतीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून बीड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना मिळून तब्बल ३ कोटी ९० लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, बीडमधील २७, धाराशिवमधील ५ आणि छत्रपती संभाजीनगरमधील ७ अशा एकूण ३९ कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्यासाठी बीड जिल्ह्यासाठी २ कोटी ७० लाख, धाराशिवसाठी ५० लाख आणि संभाजीनगरसाठी ७० लाखांचा निधी पाठविण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आझाद मैदान आंदोलनानंतर सरकारने या मदतीसह अनेक मागण्या मान्य केल्या होत्या. प्रत्यक्ष निधी वाटपाला सुरुवात झाल्याने आंदोलकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत असल्याचे दिसत आहे.