
मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी महापालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेबाबत 4 सप्टेंबर रोजी म्हणजेच शेवटच्या दिवसापर्यंत 488 हरकती आणि सूचना प्राप्त पालिकेकडे झाल्या आहेत.
या प्राप्त हरकती आणि सूचनांवर यशवंतराव चव्हाण केंद्रात 10, 11 आणि 12 सप्टेंबर 2025 या तीन दिवसांत महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी यांच्यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी विविध टप्पे निश्चित केले आहेत. या अंतर्गत 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना जारी करण्यात आली. त्यावर 22 ऑगस्ट (शुक्रवार) ते 4 सप्टेंबर (गुरूवार) दुपारी तीन वाजेपर्यंत या मुदतीत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत एकूण 488 हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत.
प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावावरील प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. मुंबईत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण केंद्र, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग या ठिकाणी 10, 11 आणि 12 सप्टेंबर 2025 या तीन दिवसांत सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेदरम्यान सुनावणी घेतली जाणार आहे.
या सुनावणीसाठी हरकतदारांनी नेमून दिलेल्या दिवशी वेळेत उपस्थित राहावे. ज्या हरकत/ सूचनादारांना सुनावणी सूचनापत्र मिळाले नसल्यास त्यांनी उप करनिर्धारक व संकलक (निवडणूक), निवडणूक मुख्य कार्यालय, तिसरा मजला, महापालिका विस्तारित इमारत, मुंबई महापालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – 400001 येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.