
मुंबई प्रतिनिधी
राज्यात महायुती सरकार आल्यापासून प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मागील आठ महिन्यांत IAS, IPS आणि पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्यानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
१९९५ बॅचमधील अधिकाऱ्यांना बढती
सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी (५ सप्टेंबर) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १९९५ बॅचमधील चार वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (ACS) पदावर बढती देण्यात आली.
* मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव अश्विनी भिडे
* नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज
* कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी
* गृह विभागाच्या (अपील व सुरक्षा) प्रधान सचिव राधिका रस्तोगी
ज्येष्ठता, अनुभव आणि प्रशासकीय योगदान या निकषांच्या आधारे या बढत्या दिल्याचे प्रशासन विभागाने स्पष्ट केले.
मंत्रालयात बदल्यांची शक्यता
दरम्यान, मंत्रालयात लवकरच काही वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नियोजन व गृहनिर्माण विभागांना नवे अधिकारी
राजगोपाल देवरा यांच्या सेवानिवृत्तीनंतर नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार सध्या वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्याकडे आहे.
तर, वल्सा नायर सिंह यांच्या सेवानिवृत्तीनंतर गृहनिर्माण विभागाचा अतिरिक्त कार्यभार नगरविकास विभागाचे ACS असीमकुमार गुप्ता यांच्याकडे देण्यात आला आहे.
या विभागांना लवकरच पूर्णवेळ अधिकारी मिळणार असून, पुढील आठवड्यात नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.