नागपूर प्रतिनिधी
राज्यात मोठ्या प्रमाणावर बसवण्यात आलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीज ग्राहकांना नव्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. एकाच महिन्याचे वीज देयक थकल्यानंतर वीजपुरवठा तात्काळ खंडित केला जात असल्याचा आरोप ग्राहक संघटनांकडून करण्यात येत आहे. याशिवाय देयक भरल्यानंतरही वीजपुरवठा पुन्हा सुरू होण्यासाठी दोन दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत असल्याचीही ग्राहकांची तक्रार आहे. मात्र महावितरणने हे आरोप फेटाळले असून, देयक भरल्यानंतर काही मिनिटांतच पुरवठा स्वयंचलितपणे सुरू होत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
राज्यात वीज व्यवस्थापन अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महावितरणने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा वेग वाढवला आहे. राज्यातील सुमारे ८८ लाख ५० हजार ग्राहकांकडे असे मीटर बसवण्यात आले असून पुढील काळात आणखी ग्राहकांपर्यंत ही व्यवस्था पोहोचवण्याचा कंपनीचा मानस आहे. या मीटरच्या माध्यमातून देयक थकल्यास वीजपुरवठा दूरस्थ पद्धतीने (रिमोटली) तात्काळ खंडित करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील २ लाख ४५ हजार ५४७ ग्राहकांचा वीजपुरवठा देयक न भरल्यामुळे खंडित करण्यात आला. मात्र ग्राहक संघटनांच्या मते, यापैकी अनेक ग्राहकांचे केवळ एका महिन्याचेच बिल थकीत होते. इतक्या कमी मुदतीत वीजपुरवठा बंद करणे ही ग्राहकांसाठी मोठी अडचण ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महावितरणकडून देयक भरण्याबाबत मोबाईल संदेशाद्वारे सूचना पाठवल्याचा दावा करण्यात आला असला, तरी अनेक ग्राहकांना अशी कोणतीही पूर्वसूचना मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
पुनर्जोडणीसाठीही विलंब?
ग्राहकांनी थकीत देयक भरल्यानंतरही वीजपुरवठा तात्काळ सुरू होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही ठिकाणी दोन ते तीन दिवस वीजपुरवठा पूर्ववत झाला नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकांनी नागपूरसह राज्यातील विविध महावितरण कार्यालयांत जाऊन नाराजी व्यक्त केल्याच्या घटना घडल्या आहेत.
ग्राहक संघटनांच्या मते, पूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी ग्राहकांना नोटीस देऊन काही प्रमाणात मुदत दिली जात असे. मात्र स्मार्ट प्रीपेड मीटरच्या प्रणालीत एकच महिन्याचे बिल थकल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक अडचणीत येत आहेत.
कर्मचाऱ्यांवरही संताप
वीजपुरवठा सुरू होण्यास उशीर झाल्यास संतप्त ग्राहक थेट महावितरण कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त करतात. प्रत्यक्षात ही समस्या मीटर प्रणालीशी संबंधित असून त्यात कर्मचाऱ्यांचा दोष नसल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.
“स्मार्ट प्रीपेड मीटरच्या ग्राहकांनी थकीत देयक भरल्यानंतरही दोन ते तीन दिवस वीजपुरवठा सुरू झाला नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे ग्राहक कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यांवर संताप व्यक्त करतात. प्रत्यक्षात हा मीटरचा दोष असून त्यात कर्मचाऱ्यांचा काहीही संबंध नाही. या मीटरला आमचाही विरोध आहे,” असे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे राज्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, वीज ग्राहक संघटनांनीही स्मार्ट मीटरविरोधात भूमिका घेतली आहे. “स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांची गळचेपी होईल, असे आम्ही सुरुवातीपासून सांगत आहोत. थकीत देयक भरल्यानंतरही एक-दोन दिवस वीजपुरवठा सुरू न करणे ही गंभीर बाब आहे. या मुद्द्याचा समावेश उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेत करण्यात येईल,” असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी म्हटले आहे.
महावितरणचा दावा
दरम्यान, महावितरणने ग्राहकांच्या तक्रारी फेटाळल्या आहेत. स्मार्ट मीटरमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन प्रणाली अधिक पारदर्शक झाली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
“स्मार्ट मीटरमध्ये मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. देयकाची मुदत संपल्यानंतर ग्राहकांना मोबाईलवर तत्काळ सूचना पाठवली जाते. ग्राहकाने देयक भरल्यानंतर साधारणतः १५ ते २० मिनिटांत स्वयंचलित पद्धतीने वीजपुरवठा सुरू होतो. काही ग्राहकांना वेगळ्या कारणांमुळे पुरवठा सुरू झाला नसेल तर त्या समस्या सोडवण्यात येतील,” असे महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट मीटर प्रणालीमुळे वीज व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल, असा महावितरणचा दावा असला तरी ग्राहकांच्या तक्रारी आणि संघटनांचा विरोध यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आगामी काळात या प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे आव्हान महावितरणसमोर उभे राहिले आहे.


