
उल्हासनगर प्रतिनिधी
उल्हासनगर : डीजे मुक्तीसाठी लढा देत सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या वकील आणि कार्यकर्त्या सरिता खानचंदानी (वय ४५) यांनी सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना उल्हासनगरमधील सरिता खानचंदानी यांच्या राहत्या इमारतीत घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये धनंजय बोडारे, शिवानी फाळके, उल्हास फाळके, जिया गोपलानी आणि राज चांदवानी या पाच जणांची नावे नमूद करण्यात आली आहेत. या सर्वांनी सतत मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.
सरिता खानचंदानी यांनी डीजे वाद्य बंदीसाठी महाराष्ट्रभर मोहिम राबवून मोठी भूमिका बजावली होती. मात्र, अचानक त्यांनी राहत्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत जीवनयात्रा संपवली. घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
या आत्महत्येनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नसले तरी पोलिसांनी नातेवाईकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.