
अकोला प्रतिनिधी
शारीरिक छळ झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. शासनानं याविरोधात कठोर कायदेसुद्धा केले आहेत. पण हा प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नाही.
अकोल्यात यापेक्षाही वेगळाच प्रकार समोर आलाय. साखरपुड्यानंतर भावी पती व सासरकडील मंडळीने मानसिक छळ केल्यानं एका बीएएमसच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सासरकडील छळ असह्य झाल्यानं अखेर तिने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अकोल्यातील जुने शहर पोलिस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील मूळ रहिवासी कीर्ती मनोहर नगराळे ही बीएएमसच्या अंतिम वर्षाला शिकत होती. ती शिक्षण आणि हॉस्पिटलमधील पार्टटाइम जॉबच्या निमित्ताने अकोल्यात एकटी राहत होती. तिचा जालना येथील डॉ. आशिष गौतम वावळे नावाच्या तरुणाशी २० जुलै २०२५ रोजी अकोट येथे साखरपुडा संपन्न झाला होता. काही दिवस उलटल्यावर मुलाच्या वडिलांनी विवाह जालना येथे करण्याचं सुचवलं, त्यासाठी मुलीच्या परिवाराकडून आठ लाख रुपयांची मागणी केली. मुलीच्या आनंदासाठी कुटुंबाने मागण्या मान्य केल्या. त्यानंतर परत २० ऑगस्टला २ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
सासरकडील मंडळींकडून सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे कीर्ती तणावाखाली गेली होती. होणारा पती डॉ. आशिषला दारूचं व्यसन असल्याची बाब तिला कळली. तिनं ही गोष्ट वडिलांना सांगितली. ह्यामुळे तिची लग्न करण्याची इच्छा नव्हती. यानंतर २६ ऑगस्टला कीर्ती आणि आशिष यांच्यात जोरदार वाद झाला. त्याच्यात वाद झाल्यानं ‘काहीतरी बरं-वाईट होऊ शकतं, तिला तातडीने घरी घेऊन या’, असं आशिषचे वडील गौतम वावळे यांनी कीर्तीचे वडील मनोहर नगराळे यांना सांगितलं. त्याच दिवशी नगराळे रात्री ९ वाजता अकोल्यात आले, पण फ्लॅटमध्ये कीर्तीने दोरीने गळफास घेतल्याचं दिसल्यानं बापाचं काळीज सुन्न पडलं. मनोहर नगराळे यांनी या प्रकरणी जुने शहर पोलिस स्थानकात तक्रार केली. जुने शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांच्या तपासात किर्तीने लिहिलेली सुसाईड नोट हाती लागली. त्यात तिने डॉ. आशिष आणि त्याचं कुटुंबीय मृत्यूला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.