
उल्हासनगर प्रतिनिधी
उल्हासनगर येथील शासकीय बालसुधारगृहातून सहा अल्पवयीन मुली पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. यापैकी दोन मुलींचा शोध पोलिसांना लागला असून अजून चार मुलींचा शोध सुरु आहे.
२७ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास या मुली अचानक बेपत्ता झाल्या. चौकशीत समोर आले की, मुलींनी मेन गेटची चावी मिळवून मुख्य दरवाजा उघडत पलायन केले. घटनेच्या वेळी सुरक्षा रक्षक जेवणासाठी गेले होते.
पोलिसांनी तत्काळ तपास सुरु करून विविध पथके नियुक्त केली. दोन मुली त्यांच्या मिराभाईंदर येथील राहत्या घरी मिळाल्या. त्यांनी पोलिसांसमोर कबुली दिली की, “आम्हाला सुधारगृहात राहायचे नव्हते, म्हणून आम्ही पळून गेलो.”
उल्हासनगरचे डीसीपी सचिन गोरे यांनी सांगितले की, उर्वरित चार मुलींचा शोध तीव्र गतीने सुरु असून लवकरच त्यांना शोधून काढले जाईल.
या घटनेनंतर बालसुधारगृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.