
बिड अंतरवाली सराटी प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा छेडलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. “सरकारी कागदपत्रांतून ५८ लाख नोंदी सापडल्या असून मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मग आरक्षणासाठी वेगळा रोडमॅप कशाला हवा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधताना जरांगे म्हणाले, “आज संध्याकाळपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करा. अन्यथा आम्ही तीन लाख ट्रक गुलाल घेऊन फडणवीस साहेबांचा बंगला भरून टाकू. त्यांनी कधी इतकी फुलं पाहिली नसतील. वास मारणारी, बिगरवासाची सगळी फुलं आणून तो बंगला भरू. जर हे केलं नाही तर माझं नाव बदललं तरी चालेल.”
ते पुढे म्हणाले, “गोरगरिबांच्या लेकरांची नाराजी नका ओढवून घेऊ. मला जेलमध्ये टाका, मी सडायला तयार आहे. फडणवीस साहेब म्हणाले, ‘तुम्हाला आरक्षण देतो, पण अंगावरचं कातडं काढून द्या’, तरीही मी तयार आहे.”
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मंगळवारी अंतरवाली सराटी येथे जरांगेंची भेट घेतली. प्रसारमाध्यमांशी बोलताना साबळे म्हणाले, “मुंबईत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे मराठा बांधवांच्या आंदोलनामुळे गणेशभक्तांना अडचण होऊ नये यासाठी मी चर्चा करण्यासाठी आलो होतो. मुंबईला जाताना मार्गात वाहतुकीची कोंडी होऊ नये, याचा अनुभव आणि माहिती मी दादांकडून घेतली.”
साबळे यांनी पुढे माध्यमांना बाहेर जाण्याची विनंती केली असली तरी जरांगे यांनी थेट कॅमेऱ्यासमोरच त्यांच्याशी संवाद साधला.