
नांदेड प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून नांदेड जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुखेड तालुक्यात तब्बल सहा गावे पाण्याखाली गेल्याने शेकडो नागरिक अडकल्याची माहिती असून, बचावासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री ढगफुटीसदृश पावसामुळे लेंडी धरणाच्या बॅकवॉटरने पूरस्थिती बिकट केली. देगलूर-मुक्राबाद मार्गावर पाणी साचून रस्त्याने तळ्याचे स्वरूप धारण केले आहे. परिणामी, अनेक कार आणि दुचाकी पाण्यात अडकल्या आहेत. स्थानिक प्रशासन आणि नागरिक दोरीच्या सहाय्याने वाहने बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, जनावरांनाही याचा फटका बसला आहे. मुखेड तालुक्यातील विविध गावांत ४० ते ५० म्हशींचा मृत्यू झाल्याचे समजते. रावणगाव परिसरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी एनडीआरएफचे जवान कार्यरत आहेत.
कोकण, विदर्भातही पावसाचा कहर
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी आहे. नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे आणि पालघर येथे मुसळधार पावसासह ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत गडचिरोलीत ४२.४ मिमी, कोल्हापूरमध्ये ३८.९ मिमी आणि रत्नागिरीत २१.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकण किनारपट्टीवर ३.५ ते ४.१ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.