
अहिल्यानगर प्रतिनिधी
अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील नेवासाफाटा येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा करुण अंत झाला. कालीका फर्निचर या दुकानात लागलेल्या आगीत झोपेतच रासने कुटुंबातील सदस्यांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या दुर्घटनेत मयूर अरुण रासने (४५), पायल मयूर रासने (३८), अंश (१०), चैतन्य (७) आणि सिंधुबाई चंद्रकांत रासने (८५) असा पाच जणांचा मृत्यू झाला. तर यश किरण रासने (२५) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मयूर रासने यांचे वडील अरुण रासने व आई हे नातेवाईकांकडे गेले असल्याने ते या दुर्घटनेतून बचावले.
रासने कुटुंब हे दुकानाच्या वरच्या मजल्यावर वास्तव्यास होते. मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लाकडी फर्निचर व ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. धुरामुळे गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला बाहेर पडता आले नाही.
पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र संपूर्ण फर्निचर दुकान भस्मसात झाले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून तपास सुरू आहे.
दोन चिमुकल्यांसह तरुण आई-वडील आणि वृद्ध आजीचा एकाचवेळी झालेला मृत्यू पाहून नेवासा परिसरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.