
सातारा प्रतिनिधी
गणेशोत्सव आणि इतर उत्सवांमध्ये कानठळ्या बसवणाऱ्या कर्णकर्कश्श डीजे यंत्रणेच्या विरोधात सातारकर नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. तब्बल १६ संस्थांनी एकत्र येत डीजे बंदीसाठी सोमवारी (दि. १८ ऑगस्ट) दुपारी साडेचार वाजता गांधी मैदान, राजवाडा ते पोवई नाका असा मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
डीजेचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. डीजेच्या प्रचंड आवाजामुळे हृदयविकाराचा झटका, कर्णबधिरता अशा समस्या वाढत असल्याचा दावा या संस्थांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात दोनदा जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र शासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.
मोर्चामध्ये पुण्यशील सुमित्रा राजे भोसले ज्येष्ठ नागरिक संघ, शाहूनगर ज्येष्ठ नागरिक संघ, अजिंक्य, पूर्वा, समता, माऊली, अभिनव, भैरवनाथ, समर्थ परिसर, राजवाडा आणि सहवास महिला ज्येष्ठ नागरिक संघ यांसह कै. डॉ. मार्तंडराव सूर्यवंशी (चाचा) फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (NIMA), इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस् ऑफ इंडिया सातारा शाखा आणि ज्ञानविकास मंडळ या संस्था सहभागी होत आहेत.
मोर्चाचे समन्वयक प्रसाद चाफेकर यांनी सांगितले की, “हा मोर्चा पूर्णतः शांततेत पार पडेल. गांधी मैदानातून निघाल्यानंतर पोवई नाक्यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन सादर केले जाणार आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाईल.”
डीजेचा मनोमन विरोध करणाऱ्या सर्व सातारकर नागरिकांनी या निषेध मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.