
सातारा प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्णकर्कश्श डीजे वाजवण्याविरोधात साताऱ्यातील नागरिक रस्त्यावर उतरले. भर पावसातही “डीजे बंदी झालीच पाहिजे” या घोषणांनी साताऱ्यातील पोवई नाका परिसर दणाणून गेला.
गेल्या काही वर्षांत गणेशोत्सव हा कानठळ्या बसवणाऱ्या आणि हृदयात धडकी भरवणाऱ्या डीजेमुळे प्रदूषणाचा उत्सव ठरू लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या उत्सवांना पूर्वीप्रमाणे आदर्श रूप प्राप्त व्हावे, यासाठी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांची दोनदा भेट घेऊन डीजे बंदीची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांचा संताप भडकला. याच पार्श्वभूमीवर आज एकूण सोळा सामाजिक संस्थांच्या सदस्यांनी मुसळधार पावसातही उत्स्फूर्तपणे मोर्चात सहभाग घेतला.
मोर्चादरम्यान “डीजे बंदी – झालीच पाहिजे”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनी शासनाने यापुढे तत्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी केली असून त्यावरच पुढील नियोजन होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.