
मुंबई प्रतिनिधी
महानगरात पोलिसांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गेल्या अवघ्या चार दिवसांत तिघा पोलिसांनी आयुष्य संपविल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. या तिन्ही आत्महत्यांचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाढत्या घटनांमुळे पोलिस दलातील तणाव, मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
शनिवारी मरोळ येथील सशस्त्र पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या मुकेश देव (४५) यांनी अंधेरी पूर्वेतील पोलीस वसाहतीतील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. दहिहंडीच्या उत्सवाच्या दिवशी देव घरात एकटे असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. शेजाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर त्यांना तातडीने जुहू येथील कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात नोंद असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जौंजाळ अधिक तपास करत आहेत.
चार दिवसांत तिसरी आत्महत्या
देव यांचा मृत्यू हा मागील चार दिवसांत घडलेला तिसरा प्रकार आहे.
१३ ऑगस्ट रोजी कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यातील गणेश राऊळ (३२) यांनी नालासोपारा स्थानकात रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.
१४ ऑगस्टला भाईंदर येथे कार्यरत असलेल्या ऋतिक चौहान (२५) यांनी राहत्या घरात गळफास घेतला. २०२३ मध्येच त्यांनी पोलीस सेवेत प्रवेश केला होता.
तर तिसरी आत्महत्या शनिवारी अंधेरीत मुकेश देव (४५) यांनी केली.
तिन्ही घटनांमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, पोलिसांच्या मानसिक तणावाबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
मुंबईत ४ वर्षांत २५ आत्महत्या
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२० ते जून २०२५ या कालावधीत मुंबई पोलीस दलातील ४२७ कर्मचाऱ्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. त्यापैकी तब्बल २५ जणांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई पोलिसांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब मानली जात असून, दलातील तणाव कमी करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याची भावना तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.