
मुंबई प्रतिनिधी
बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने 2025-26 या वर्षासाठी 500 कायमस्वरूपी जनरलिस्ट ऑफिसर (स्केल II) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी 30 ऑगस्ट 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA) अर्हता असणे आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 55 टक्के गुणांची सवलत आहे. तसेच बँकिंग क्षेत्रात ऑफिसर म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 22 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षणानुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा (75% वेटेज) आणि मुलाखत (25% वेटेज) या दोन टप्प्यांतून होणार आहे. या दोन्ही टप्प्यांत पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्केल II अंतर्गत 64,820 ते 93,960 रुपये मासिक वेतन, तसेच विविध भत्ते आणि सुविधा मिळतील.
अर्ज करण्याची पद्धत
इच्छुक उमेदवारांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत संकेतस्थळावर bankofmaharashtra.in भेट द्यावी. Careers विभागात जाऊन Recruitment of Officers in Scale II – Project 2025-26 या पर्यायावर क्लिक करून ऑनलाइन नोंदणी करावी. अर्ज सादर करताना दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2025 असून भरती अधिसूचना व अधिक तपशील बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.