
मुंबई प्रतिनिधी
राज्यात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मुंबईसह बहुतेक विभागांत शुक्रवारी व शनिवारी अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे पूर, भिंत कोसळणे, दरडी कोसळणे अशा विविध दुर्घटनांमध्ये १२ जणांचा बळी गेला असून शेकडो गावे संपर्कविहीन झाली आहेत.
मुंबईत अवघ्या तीन तासांत २०० मिमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्रीनंतर ते पहाटेपर्यंत झालेल्या सरींनी मुंबई ‘तुंबई’ झाली. विक्रोळीतील पार्कसाईट भागात घरावर दरड कोसळून पिता-पुत्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विदर्भात गेल्या २४ तासांत ७ जणांचा मृत्यू झाला असून, नांदेडमध्ये तिघांचा बळी गेला. मराठवाड्यात नांदेड, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत सलग दोन दिवस मुसळधार पावसाचा कहर झाला. छत्रपती संभाजीनगरातील गेवराई व बनगाव भागात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पळशी गावातील नदीला आलेल्या पुरामुळे दोन पूल वाहून गेले, तर नारेगाव भागात नाल्याला आलेल्या पुरामुळे शेकडो घरांत पाणी शिरले.
दरम्यान, बीडच्या १७, धाराशिवच्या १२ व परभणीच्या पाच मंडळांत अतिवृष्टी झाली. नांदेडच्या कंधार तालुक्यात भिंत कोसळून आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांचा मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी–नांदापूर मार्ग पुरामुळे तासन्तास ठप्प राहिला.
शेतीचे नुकसान
सलग पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, हळद, ऊस, तूर, भाजीपाला यांना मोठा फटका बसला आहे. सुपीक माती वाहून गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आगामी अंदाज
हवामान विभागानुसार १७ ते २३ ऑगस्टदरम्यान राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पावसाचा इशारा आहे. रविवारी आणि सोमवारी तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नाशिक, जळगाव आदी जिल्ह्यांमध्येही पुढील दोन दिवस जोरदार सरींची शक्यता आहे