
ठाणे प्रतिनिधी
ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष उसळला असून, गोविंदांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात परंपरेप्रमाणे मानाच्या हंड्यांभोवती गर्दी झाली आहे. त्यात धर्मवीर आनंद दिघे यांची ‘सोन्याची हंडी’ ही ठाण्यातील मानाची हंडी मानली जाते. दिघेंच्या पावलावर पाऊल ठेवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे.
या दहीहंडील सलामी देण्यासाठी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरातील गोविंदा पथकांची दिमाखदार रॅली टेंभीनाक्याकडे वळली होती. मंडळांनी थर रचत सलामी दिली आणि डीजेच्या तालावर थिरकत उत्सवाला रंग चढवला. बॉलीवूडचे अभिनेता गोविंदा, शरद केळकर, संतोष जुवेकर यांसारखे कलाकारही या सोहळ्यास उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही उपमुख्यमंत्री शिंदे सर्वप्रथम टेंभीनाक्याला दाखल झाले. दुपारी साधारण एकच्या सुमारास ते मंचावर पोचताच डीजेवर अचानक ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे’ हे गाणे वाजू लागले. हे गाणे ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. गाण्याचा ताल एकीकडे गोविंदांना उत्साही करत असताना, दुसरीकडे यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
ठाण्याच्या मानाच्या हंड्याभोवतीचा हा जल्लोष, आणि त्यावरून सुरू झालेली ही कुजबुज, उत्सवाच्या रंगातही राजकीय गोडी मिसळून गेल्याचे चित्र टेंभीनाक्याला पाहायला मिळाले.