
मुंबई प्रतिनिधी
बांद्रा (पूर्व) | उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील परिसरात शनिवारी पार पडलेला बांद्र्यातील मानाचा दहीहंडी सोहळा नेहमीप्रमाणे उत्साह, जल्लोष आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे गाजला. तब्बल २६ वर्षांची परंपरा अखंड राखत या दहीहंडी महोत्सवाने पुन्हा एकदा परिसरातील नागरिकांना एकत्र आणलं.
या महोत्सवाचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख तथा आमदार अनिल परब यांच्या वतीने करण्यात आले होते. या सोहळ्याला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आमदार वरुण सरदेसाई, शाखाप्रमुख अरुण कांबळे, सदा परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, माजी नगरसेविका रोहिणी कांबळे, शशिकांत येलमकर, बबन साळवी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उंचावर लटकविलेल्या दहीहंडीपर्यंत पोहोचण्यासाठी गोविंदांनी थरावर थर रचले, त्यावेळी परिसरात उसळलेले जल्लोषाचे वातावरण पाहण्यासारखे होते. फोडलेल्या दहीहंडीतील दुध, दही आणि फुलांचा वर्षाव होताच उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जल्लोष केला.
मुंबईसह उपनगरातील अनेक नामांकित गोविंदा पथकांनी या दहीहंडीमध्ये सहभाग नोंदवला. स्पर्धात्मकतेसोबतच सुरक्षिततेचा विचार करून आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेतली होती. त्यामुळे अपघातविरहित पद्धतीने हा सोहळा पार पडला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी हाजेरी लावली होती. बांद्र्यातील मानाची दहीहंडी हा केवळ क्रीडा आणि ताकदीचा खेळ नसून परिसरातील लोकांना एकत्र बांधणारा सांस्कृतिक सोहळा म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच गेल्या दोन शतकाहून अधिक काळ हा उत्सव ‘मानाचा’ ठरला आहे.