
नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबार – शहरातील सिद्धिविनायक चौकात राहणाऱ्या मोहित राजपूतच्या हत्येने संपूर्ण नंदुरबार हादरले आहे. बॅनर लावण्याच्या क्षुल्लक वादातून काही समाजकंटकांनी मोहितवर जीवघेणी मारहाण केली. गंभीर अवस्थेत सुरत रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी (दि. ११) मोहितने अखेरचा श्वास घेतला.
मोहितचा मृत्यू समजताच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बुधवारी (दि. १२) सायंकाळी मृतदेह घरी पोहोचताच कुटुंबीय व मित्रांनी आक्रोश करत “मुख्य सूत्रधाराला अटक केल्याशिवाय अंत्यविधी नाही” असा ठिय्या मांडला. काही काळासाठी वातावरण तापले.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक संजय महाजन व निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन कुटुंबीयांची समजूत काढली. दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देत अखेर जमाव शांत झाला आणि अंत्यविधीची प्रक्रिया सुरू झाली.
या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसांनी फिर्यादी जयेश राजपूत यांच्या तक्रारीवरून सुनील राठोड, मुकेश राजपूत, संजय राजपूत, यशवर्धन लुळे व अनिकेत तवर या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दीड वर्षापूर्वीच मोहितच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला होता. घरची संपूर्ण जबाबदारी पेलणारा मोहित अकाली गमावल्यानं आई-वडील, पत्नी आणि मुलांच्या आयुष्यावर दुःखाचा काळोखा दाटला आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.