
नवी दिल्ली वृत्तसंस्था
दिल्ली आणि आसपासच्या परिसरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे लक्ष वेधत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना ८ आठवड्यांच्या आत पकडून नियुक्त निवारा केंद्रांमध्ये हलवण्याचे निर्देश न्यायालयाने संबंधित प्रशासनाला दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या असून, लहान मुलांसह नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार, एमसीडी आणि एनडीएमसी यांनी समन्वय साधून, निश्चित वेळेत पुरेशी निवाऱ्याची व्यवस्था उभारावी आणि सार्वजनिक ठिकाणांहून भटकी कुत्री हटवावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.
#WATCH | On SC order to move all stray dogs in Delhi-NCR to shelter in 8 weeks, Delhi CM Rekha Gupta says, " The people of Delhi had been troubled for quite some time now on this issue. This problem had taken a formidable form and is now standing before Delhi, and providing a… pic.twitter.com/Y0DhLRvxVY
— ANI (@ANI) August 11, 2025
पुन्हा रस्त्यावर सोडण्यास मज्जाव
न्यायालयाने स्पष्ट केले की, एकदा शेल्टरमध्ये हलवलेली कुत्री पुन्हा रस्त्यावर सोडू नयेत. संबंधित संस्था किंवा व्यक्ती जर कुत्रे पकडण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतील, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
रेबिजचा धोका आणि न्यायालयाची दखल
गेल्या महिन्यात कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर रेबिजच्या घटनांबाबत माध्यमांत आलेल्या बातम्यांची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली होती. दररोज शेकडो लोकांना चावा घेतल्याच्या तक्रारी मिळत असून, त्यात लहान मुले आणि वृद्ध नागरिक जास्त प्रमाणात बाधित होत आहेत.
नगरपालिकेची तयारी
दिल्ली महानगरपालिकेने अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटर्समध्ये सुधारणा करण्याचा आणि झोननिहाय अँटी-रेबिज जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही प्रक्रिया गतीमान होण्याची अपेक्षा आहे.
हा आदेश लागू झाल्यास, राजधानीत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर निर्णायक पाऊल उचलले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.