
* उत्तराखंडात ढगफुटीचा कहर; गंगोत्री परिसरात शेवटचा संपर्क – नंतर सन्नाटा
पुणे प्रतिनिधी
उत्तराखंडमध्ये ढगफुटीने थैमान घातल्यानंतर हाहाकार माजला आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री परिसरात आलेल्या भीषण पुरामुळे अनेक गावं ढिगाऱ्याखाली गाडली गेली असून, महाराष्ट्रातील पर्यटकांशी संपर्क तुटल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातून गेलेले १९ पर्यटक बेपत्ता झाले आहेत. हे सर्व १९९० च्या दहावीच्या बॅचमधील सहपाठी होते. यामध्ये ८ पुरुष व ११ महिलांचा समावेश असून, त्यांनी १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला पर्यटनासाठी प्रस्थान केले होते.
शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून
या पर्यटकांचा शेवटचा संपर्क गंगोत्री भागातून झाला होता. काल सकाळी काही सदस्यांनी सोशल मीडियावर फोटो आणि स्टेटस टाकले होते. मात्र त्यानंतर दुपारी या भागात ढगफुटीची भीषण दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली.
ग्रुपमधील एका महिलेनं शेवटचा कॉल आपल्या मुलाला करत “आम्ही सर्वजण सुखरूप आहोत,” असं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर कोणाशीच संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे गावात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.
कुटुंबियांची रात्र रडवेली…
या सर्व पर्यटकांचे नातेवाईक सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून मोबाईल लागणे बंद आहे. काळजीने व्याकूळ झालेल्या लहान मुलांनी रडून रडून घराचा आकांत केला आहे.
सुप्रिया सुळे यांचे ट्वीट, प्रशासनाला मदतीचं आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विटरवरून चिंता व्यक्त करत प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी बेपत्ता झालेल्यांची नावे आणि संपर्क क्रमांकही शेअर केले आहेत.
सोलापूरचे चार तरुणही बेपत्ता
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील चार तरुणही गंगोत्री परिसरात गेले होते. काल सकाळी ११ वाजता त्यांनी फोन करून “आम्ही सुखरूप आहोत,” असं सांगितलं होतं. पण त्यानंतर संपर्क पूर्णतः तुटला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्याही काळजाचा ठोका चुकला आहे. जिल्हा प्रशासन उत्तराखंड प्रशासनाशी संपर्कात असल्याचे कळते.
नांदेडचे पर्यटक सुखरूप
नांदेड जिल्ह्यातील ११ पर्यटक सध्या यमुनोत्री येथे सुरक्षित असून, प्रशासनाकडून त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधला जात आहे.
प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफ यंत्रणा सक्रिय
उत्तराखंड प्रशासन, पोलीस दल आणि आपत्कालीन यंत्रणा बचाव व शोध मोहिम राबवत आहेत. अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांच्या मनात भीतीचे सावट गडद होत चालले आहे.