
नाशिक प्रतिनिधी
एका क्षणाने आयुष्य कायमचं बदलून टाकलं! नाशिकचा 26 वर्षीय शेतकरी गौरव निकम रविवारी सकाळी ठाण्याहून घरी परतत असताना आयुष्यभर लक्षात राहील असा भयावह प्रसंग घडला.
तपोवन एक्स्प्रेसने प्रवास करताना गौरव ट्रेनच्या दारात उभा राहून कोणाशी तरी फोनवर बोलत होता. ट्रेन आंबिवली स्थानकाजवळ येत असतानाच बाहेरून आलेल्या एका फटका मार चोराने जोरात हल्ला केला. अचानक झालेल्या धक्क्याने गौरवचा तोल गेला आणि तो थेट रूळावर कोसळला. क्षणातच त्याचा एक पाय ट्रेनखाली चिरडला गेला.
जखमी गौरव वेदनांनी विव्हळत असतानाही त्याचं दु:ख इथेच संपलं नाही! घटनास्थळी आलेल्या एका चोरट्याने त्याच्या खिशातील मोबाइल व रोकड हिसकावून पोबारा केला. एका क्षणात जखम, अपंगत्व, लूट आणि मानसिक वेदना — हे सगळं गौरवच्या वाट्याला आलं.
या घटनेनंतर पोलिसांनी एका अल्पवयीन इराणी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. इराणी टोळ्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती पोलिसांना चांगलीच आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत तो ‘अल्पवयीन’ असल्यामुळे त्याला मिळणारी शिक्षा मर्यादितच राहणार आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे — फक्त अल्पवयीन असल्यामुळे गंभीर गुन्ह्यांना माफ केलं जावं का? एका व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या घटनेची एवढीच किंमत असावी का?
आंबिवली परिसरात अशा घटना याआधीही घडल्या असून, आता कठोर कायदे व जलद न्यायाची मागणी जोर धरत आहे. अन्यथा पुढचा गौरव निकम कधी, कुठे आणि कसा ट्रेनने प्रवास करताना आयुष्य गमावेल याचा नेम नाही.