
अमरावती प्रतिनिधी
अमरावतीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण शहर हादरले आहे. फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात कार्यरत आशा राहुल धुळे-तायडे (38, रा. गुरुकृपा कॉलनी, वडाळी) या शुक्रवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळल्या. ही हत्या असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
आशा यांचे पती राहुल धुळे हे राज्य राखीव पोलीस बल क्र. 9 मध्ये शिपाई आहेत. गेल्या 13 तारखेपासून आशा या रजेवर होत्या. त्यांना 14 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांची मुलगी आहे.
घटनेचा थरार
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आशा घरी एकट्याच होत्या. पती व मुलं बाहेर होते. मुलगा घरात परत येत असताना त्याने घरातून दोन अनोळखी व्यक्तींना बाहेर पडताना पाहिलं. घरात प्रवेश केल्यावर आई बिछान्यावर बेशुद्धावस्थेत पडलेली दिसली. हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने मुलाने घाबरून वडिलांना फोन केला.
तत्काळ फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार रोशन शिरसाट, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. महिलेच्या गळ्यावर व्रण असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला असून तपास सुरू आहे.