
पनवेल प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्योगपतींना थेट इशारा दिला आहे. “उद्योग सुरू करायचा असेल तर शेतकऱ्यांना पार्टनर घ्या; नुसती जमीन विकत घेऊन बाहेरच्या राज्यातील लोकांना रोजगार देणार असाल, तर जमिनी मिळणार नाहीत”, असा ठणकावाट त्यांनी पनवेलमधील शेतकरी कामगार पक्षाच्या ७८व्या वर्धापन दिन सोहळ्यात केला.
“हल्लीचे आजार आणि राजकारण सारखेच”
सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “पूर्वी आजार नाव घेऊन यायचे, आता कळतच नाही काय झालंय. अगदी तसंच महाराष्ट्राचं राजकारण झालंय. कुणी एका पक्षातून दुसऱ्यात, तर कुणी उलट्या मार्गाने… आणि आपण विचारतो काय झालं? तर उत्तर – व्हायरल झाला!”
मराठी माणसाचा विचारच नाही
राज ठाकरेंनी सरकारवर भाष्य करताना टीका केली, “मुख्यमंत्री लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात. पण महाराष्ट्रात नोकरीसाठी येणाऱ्या बाहेरच्या लोकांना मराठी शिकवायची गरज मुख्यमंत्री मानत नाहीत. भूमीपुत्र, मराठी माणूस यांचा विचार कोणीच करत नाही”.
रायगडचा प्रश्न आणि जयंत पाटील यांना आवाहन
रायगडमधील जमिनींच्या विक्रीचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे म्हणाले, “जमिनीचे व्यवहार करणारे पण आपलेच… कुंपणच शेत खात आहे. उद्योग येतायत, पण मराठी कामगारांना वगळून बाहेरच्या लोकांची भरती होतेय. अशा परिस्थितीत शेतकरी कामगार पक्षाचा काय उपयोग? जयंत पाटील यांनी हा प्रश्न आपल्या हाती घ्यावा”.
गुजरातचे उदाहरण देत सवाल
गुजरातमध्ये बाहेरील राज्यातील लोकांना शेतजमीन खरेदी करता येत नाही, असे उदाहरण देत ठाकरे म्हणाले, “ज्या राज्यातून पंतप्रधान, गृहमंत्री आहेत, तिथे स्वतःच्या जमिनींचे रक्षण केले जाते. मग महाराष्ट्राने का नाही करायचं?”
उद्योगपतींना इशारा
राज ठाकरेंनी शेवटी स्पष्ट संदेश दिला, “यापुढे जमिनींसाठी उद्योगपती आले तर सरळ सांगा – आम्ही शेतकरी तुमच्या कंपनीत पार्टनर होऊ. आमची मुलं तिथे कामाला लागतील. पण फुकट जमिनी देणार नाही. हे हक्क जपले नाहीत, तर आपल्या हातात काहीच राहणार नाही”.