
हैदराबाद
लग्नात 30 लाखांची रोकड, 30 तोळे सोनं, आणि आलिशान कार देऊनही दगाफटका टळला नाही. हैदराबादमध्ये एका 28 वर्षीय डेंटिस्ट पत्नीने पतीच्या बेवफाईला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. तिचा पती, सुप्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ. सृजन यांचे सोशल मीडिया इन्फ्लुएंसरबरोबर चाललेले कथित प्रेमसंबंधच या आत्महत्येचे मुख्य कारण असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
डॉ. प्रत्युषाची वेदनादायक कहाणी
मृत डॉ. प्रत्युषा या खाजगी रुग्णालयात दंतचिकित्सक म्हणून कार्यरत होत्या. 2017 मध्ये त्यांचा विवाह डॉ. अल्लादी सृजन (वय 32) यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी प्रत्युषाच्या पालकांनी 30 लाख रुपये रोख, 30 तोळे सोनं आणि महागडी गाडी सासरच्या मंडळींना दिली होती. दोन मुलं असलेल्या या दाम्पत्याचा संसार बाहेरून सुखी दिसत असला, तरी त्यामागे वेदनेची एक काळी छाया होती.
इन्फ्लुएंसर श्रुतीशी वाढत्या जवळीकीचा संशय
पोलिस तपासात समोर आलं आहे की, डॉ. सृजन यांची ओळख काही महिन्यांपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रुती ऊर्फ ‘बुट्टा बोम्मा’ हिच्याशी झाली होती. इंस्टाग्रामवरील एका रीलमुळे दोघांमध्ये संपर्क झाला आणि त्यातूनच कथित प्रेमसंबंधाचा सुरूवात झाली. ही बाब डॉ. प्रत्युषाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पतीला जाब विचारला, मात्र डॉ. सृजन यांच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.
शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप
प्रत्युषाच्या कुटुंबीयांनी लावलेल्या आरोपानुसार, पतीच्या बेफिकीर वागणुकीसोबतच त्यांच्याकडून शारीरिक मारहाणही होत होती. सासरच्यांनी देखील तिला सतत टोमणे मारणे, दबाव आणणे, आणि मानसिक छळ करणं सुरूच ठेवलं होतं. या सर्व प्रकारांना कंटाळून डॉ. प्रत्युषा गेल्या काही महिन्यांपासून तीव्र तणावात होत्या.
शेजारच्या खोलीत नवरा आणि मुले, आणि इथे अखेरचा श्वास
सोमवारी सकाळी डॉ. प्रत्युषा यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्या वेळी पती आणि दोन लहान मुलं शेजारच्या खोलीत होते. ही बातमी समजताच परिसरात एकच खळबळ उडाली असून समाजमाध्यमांवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
डॉ. सृजन आणि इन्फ्लुएंसरवर गुन्हा दाखल
डॉ. प्रत्युषाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डॉ. सृजन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्रुती यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सृजन यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
नवरा डॉक्टर, पत्नी डॉक्टर, तरीही नात्यांना चुकलं उत्तरदान
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर समाजातील हुंडा, स्त्रीवर होणारा मानसिक छळ आणि वैवाहिक बेवफाई या प्रश्नांवर गंभीर विचार करण्यास भाग पाडणारी आहे. उच्चशिक्षित, डॉक्टर कुटुंब असूनही डॉ. प्रत्युषाला न्याय मिळाला नाही, हे आजच्या समाजाचं काळं वास्तव अधोरेखित करतंय.