
नवी दिल्ली प्रतिनिधी
शिवसेना पक्ष-चिन्ह वादावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मोठं विधान करण्यात आलं असून, या प्रकरणावर येत्या ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांआधीच या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा निकाल लागू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर आज सोमवारी (दि. १४ जुलै) ही सुनावणी झाली. शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांनी यापूर्वी २ जुलै रोजी केली होती.
याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी, “ही केस आम्हाला आता संपवायची आहे,” असं स्पष्ट करत ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी घेणार असल्याचे संकेत दिले. यामुळे याचिकेचा निकाल लवकरच लागणार असून, उद्धव ठाकरे गटाला तात्पुरता दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल केले होते. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालिका निवडणुका जवळ येत असताना, या प्रकरणाचा निकाल सत्तेच्या गणितावर मोठा परिणाम करणारा ठरणार आहे.
एकनाथ शिंदे गटाचे वकील याआधीच दावा करत आहेत की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका हेच चिन्ह आणि नाव वापरून लढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचिका फेटाळली जावी, असा युक्तिवाद त्यांनी केला.
ऑगस्टमध्ये न्यायालय कोणाच्या बाजूने निर्णय देणार? शिवसेनेचं मूळ पक्षत्व कोणाला मिळणार? आणि धनुष्यबाणावरचा दावा कोणता गट जिंकणार? याकडे आता महाराष्ट्राचं राजकारण आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.