नवी दिल्ली वृत्तसंस्था
देशभरातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुलीची पद्धत पूर्णतः बदलण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले उचलली असून, येत्या काळात टोल प्लाझावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सरकारकडून घेतली जात आहे.
महामार्गांवर प्रवास करताना टोल नाक्यांवरील गर्दी, रांगा आणि वेळेची होणारी नासाडी टाळण्यासाठी टोल वसुली पूर्णपणे कॅशलेस करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोल प्लाझावरून पुढे जाण्यासाठी वाहनचालकांना फास्टॅग किंवा यूपीआयच्या माध्यमातूनच टोल भरावा लागणार आहे. रोख रक्कम देणाऱ्या वाहनांना टोल नाक्याच्या पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे संकेत आहेत.
टोल वसुलीत ‘डिजिटल’ युगाची सुरुवात
केंद्र सरकारकडून टोल वसुलीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी हा बदल करण्यात येत आहे. सध्या फास्टॅगच्या माध्यमातून बहुतांश टोल वसुली होत असली, तरी काही ठिकाणी अद्याप रोख व्यवहार सुरू आहेत. मात्र नव्या नियमांनुसार टोल प्लाझावर रोख व्यवहार पूर्णपणे बंद केले जाणार असून, फक्त फास्टॅग किंवा यूपीआय (फोनपे, गुगल पे, भीम यूपीआय आदी) माध्यमातूनच टोल भरता येणार आहे.
१ एप्रिलपासून अंमलबजावणीची शक्यता
हा निर्णय येत्या आर्थिक वर्षापासून, म्हणजेच १ एप्रिल २०२५ पासून लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यूपीआयद्वारे टोल भरण्याच्या सुविधेला वाहनचालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने, रोख व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, या नव्या नियमांची अचूक अंमलबजावणीची तारीख अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र नव्या आर्थिक वर्षात हे नियम लागू होतील, असे जवळपास निश्चित मानले जात आहे.
वाहनचालकांचा वेळ आणि इंधनाची बचत
टोल नाक्यांवर रोख पैसे देण्यासाठी थांबावे लागल्याने अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. यामुळे वेळेची नासाडी तर होतेच, शिवाय इंधनाचाही अपव्यय होतो. कॅशलेस टोल वसुलीमुळे वाहनांचा प्रवास अधिक सुरळीत होणार असून, महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
एकूणच, टोल वसुलीच्या नव्या डिजिटल धोरणामुळे वाहनचालकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार असून, महामार्गांवरील अनुभव बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.


