मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आता राजकीय वर्तुळात एकच प्रश्न चर्चेचा ठरतो आहे – मुंबईचा प्रथम नागरिक कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मुंबईचा महापौर हा मराठीच असेल,” अशी स्पष्ट भूमिका मांडल्यानंतर या पदासाठीच्या चर्चांना वेग आला आहे.
भाजपमधील अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांची नावे समोर येत असली, तरी सध्या सर्वाधिक चर्चा होत आहे ती प्रभाकर शिंदे यांच्या नावाची. भाजपचे ‘जुने जाणते’ आणि आक्रमक नेता अशी ओळख असलेले प्रभाकर शिंदे हे मूळचे शिवसैनिक. दीर्घकाळ शिवसेनेत काम केल्यामुळे ठाकरे गटाची कार्यपद्धती, रणनीती आणि अंतर्गत राजकारणाची त्यांना चांगली जाण आहे.
महानगरपालिकेत गटनेते म्हणून काम करताना प्रशासनावर त्यांनी निर्माण केलेली पकड आणि सभागृहातील आक्रमक भूमिका पाहता, भाजपसाठी ते ‘हुकमी एक्का’ ठरू शकतात, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे.
‘मराठी अस्मिता’ला उत्तर देणारा चेहरा?
उद्धव ठाकरे यांच्या ‘मराठी अस्मिता’च्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपला तितकाच प्रभावी मराठी चेहरा पुढे करावा लागणार आहे. प्रभाकर शिंदे हे केवळ मराठीच नाहीत, तर आक्रमक वक्तृत्व आणि प्रशासकीय अनुभवामुळे ते या भूमिकेत फिट बसतात, असे भाजपच्या नेत्यांचे मत आहे. स्थायी समितीपासून गटनेतेपदापर्यंतचा त्यांचा प्रवास पाहता, ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यासाठी ते योग्य उमेदवार ठरू शकतात.
विनोद मिश्रा यांचाही दावा
दरम्यान, भाजपचे फायरब्रँड नेते विनोद मिश्रा यांचेही नाव महापौरपदाच्या शर्यतीत आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांनी मागील सत्ताधाऱ्यांना घेरले होते. त्यामुळे त्यांची दावेदारीही दुर्लक्षित करता येणार नाही. मात्र ‘मराठी महापौर’ या फडणवीसांच्या भूमिकेमुळे सध्या तरी प्रभाकर शिंदे यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.
तरीही भाजपमध्ये अंतिम निर्णय हा नेहमीप्रमाणे शेवटच्या क्षणीच जाहीर होतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार अखेर कोणता राजकीय ‘गुगली’ टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


