
बीड प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. निपाणी टाकळी गावात उपसरपंच लक्ष्मण चव्हाण यांना भररस्त्यात काठी आणि दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतरचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
बोगस कामाचा केला होता पर्दाफाश, म्हणूनच चव्हाण यांना चोप?
घटना निपाणी टाकळी ग्रामसभेनंतर घडली. उपसरपंच चव्हाण यांनी ग्रामसभेत बोगस विकासकामांवर प्रश्न उपस्थित करत संबंधितांवर थेट टीका केली होती. यामुळे चिडलेल्या सरपंच पती भगवान राठोड, जयकोबा राठोड आणि अन्य ४–५ जणांनी माजलगाव–परभणी रस्त्यावर चव्हाण यांना अडवून काठ्या आणि दगडांनी हल्ला केला.
या हल्ल्यात उपसरपंच गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे इतकी गंभीर घटना घडूनही अद्याप कोणत्याही आरोपीविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही.
गुन्हेगारीच्या घटनांनी बीड पुन्हा चर्चेत
बीड जिल्ह्यात गेल्या काही काळात हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. निपाणी टाकळीतील घटनेचा धक्का विसरत नाही तोच साक्षाळ पिंपरी गावातून आणखी एक हल्ल्याची घटना समोर आली आहे.
माजी सरपंचाचा कोयत्याने हल्ला; युवक गंभीर जखमी
साक्षाळ पिंपरी येथे माजी सरपंच गोरख काशीद यांनी रस्त्याच्या वादातून प्रकाश काशीद या तरुणावर कोयत्याने हल्ला केला. डोक्यावर गंभीर वार झाल्याने प्रकाशला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपी गोरख काशीदला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
“गुन्हेगारीला पाठीशी घालणार नाही” पोलिसांची प्रतिक्रिया
बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, “साक्षाळ पिंपरीतील हल्ला अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. कोयत्याचा वापर करणे हे उद्देशपूर्वक जीव घेण्याच्या प्रयत्नाचे लक्षण आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाई केली जाईल.”
कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
एकीकडे सरपंच, माजी सरपंच आणि लोकप्रतिनिधींच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर दुसरीकडे पोलिस आणि प्रशासन यांची कार्यक्षमता व निष्पक्षता तपासली जात आहे. बीड जिल्ह्यात काय चाललंय? असा संतप्त सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.