
बिड प्रतिनिधी
“पैसे नाहीत? तर तुझी बायको माझ्या घरी सोड…” या क्रूर शब्दांनी एका पतीचं काळीज फाटलं. अपमान, छळ आणि अपार मानसिक वेदनांनी एका तरुण व्यावसायिकाने जीवनयात्रा संपवली. बीड जिल्ह्यातील ही हृदयविदारक घटना समाजाला हादरवणारी आहे.
पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे राम फटाले हे युवक कपड्यांचा व्यवसाय करायचे. सात वर्षांपूर्वी त्यांनी एका सावकाराकडून अडीच लाख रुपये उसने घेतले. दरमहा २५ हजार रुपये हफ्त्याने परतफेड सुरू होती. परंतु सावकारी साखळदंड मात्र सुटत नव्हता. दरवेळी नवा हप्ता, नव्या अटी, आणि वाढत्या अपेक्षा. शेवटी “पैसे वेळेवर देत नाहीस, तर तुझी पत्नी माझ्या घरी पाठव” असा संतापजनक अपमान त्यांनी सहन केला.
या अपमानाने, या निर्दयी शब्दांनी, राम फटाले यांनी दुसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पाठीमागे त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून कोणाचंही काळीज द्रवेल. पत्नी, मुलं, आई-वडील यांची क्षमा मागत, त्यांनी शेवटच्या ओळीत स्पष्टपणे लिहिलं – “माझ्या मृत्यूला डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्यांच्या पत्नी वर्षा जबाबदार आहेत. त्यांनी मला मानसिक छळ दिला.”
त्यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तातडीने सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे, यामध्ये भाजप पदाधिकारी असलेले डॉ. लक्ष्मण जाधव मुख्य आरोपी आहेत. आतापर्यंत तिघांना अटक झाली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
रामचं डोळे पाणावणाऱ्या शब्दांतलं पत्र…
“प्रिय आई-पप्पा, सुजय, गौरी आणि रेणुका – मी चांगला पती, मुलगा, बाबा होऊ शकलो नाही, माफ करा. रेणुका, मी तुझ्यावर सर्व जबाबदारी टाकतोय… माझं दहावं-तेरावं करू नका… मी फक्त इतकंच मागतो की, माझ्या बँक खात्यातून उरलेली रक्कम काढून कुटुंबाला द्या. डॉ. जाधव आणि त्यांच्या पत्नीने मला खूप त्रास दिला, मी त्यांच्यामुळे मरण पत्करतोय.”
या पत्राने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावला नाही, तर संपूर्ण समाजाला सावकारीच्या विषारी विळख्यात अडकवण्याचा वास्तव चेहरा समोर आणला आहे.
एका महिन्याच्या आत ही बीडमधील तिसरी आत्महत्या…
या घटनेला अवघा महिना झाला नाही, तोच बीडमध्ये सावकारी जाचाला कंटाळून आणखी दोघांनी आधीच आत्महत्या केली होती. एकीकडे सरकार सावकारी विरोधात कायदे कडक करण्याचे आश्वासन देते, तर दुसरीकडे या घटना वाढतच आहेत.
आता लोकांचा प्रश्न स्पष्ट आहे – “सावकारांविरुद्ध कठोर कारवाई कधी?”
या दु:खद घटनेमुळे बीडमधील जनतेच्या मनात संताप आहे. एका पित्याने मुलांसमोर गळफास लावावा, हे आपल्या व्यवस्थेचं अपयश नाही का?
सरकारने यावर तात्काळ पावलं उचलावीत, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची मागणी आहे. कारण उद्या अजून एखादा राम असाच निघून गेला, तर जबाबदार कोण?