
अकोला प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघातांचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी रात्री वाशीम जिल्ह्यातील वनोजा आणि कारंजा दरम्यान चॅनल क्र. २१५ जवळ घडलेल्या एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की भरधाव मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट दुभाजकावर आदळली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. मृतांमध्ये वैदही जयस्वाल, माधुरी जयस्वाल, संगीता जयस्वाल आणि राधेश्याम जयस्वाल यांचा समावेश असून, हे सर्व नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी होते. जयस्वाल कुटुंब पुण्यातील एका नामकरण समारंभासाठी गेले होते व परतीच्या प्रवासात हा अपघात झाला.
जखमी झालेल्या व्यक्तीवर वाशीम येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन बचाव पथक आणि महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून, पोलीस घटनास्थळी पंचनामा करून अधिक तपास करत आहेत.
मेहकरमध्ये विश्रांती घेतली असती, तर वाचले असते प्राण…
जयस्वाल कुटुंबीयांनी प्रवासादरम्यान मेहकर येथे नातेवाइकांच्या घरी थोडावेळ विश्रांती घेतली होती. मात्र नातेवाइकांनी थांबण्याचा आग्रह केल्यानंतरही त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला आणि काही अंतरावरच या अपघाताने त्यांचा जीवनप्रवास संपवला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
समृद्धी महामार्गाची सुरक्षितता तपासण्याची गरज
अत्याधुनिक सुविधांनी सज्ज समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनचालकांचा भरधाव वेग, दीर्घकाळ विश्रांती न घेता प्रवास, आणि थकव्यामुळे होणारी डुलकी ही अपघातांची मुख्य कारणं असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना जरी करण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्यांचा परिणाम दिसून येत नाही.
या अपघाताने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील प्रवास किती ‘समृद्ध’ आहे की ‘संकटदायक’, यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सरकार आणि यंत्रणांनी या मार्गावरील सुरक्षा उपायांची पुनर्तपासणी करून अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.