मुंबई प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असतानाच महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनने २ जुलै २०२५ पासून संपूर्ण राज्यभरात अनिश्चित काळासाठी स्कूल बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शालेय वाहतुकीसंबंधी प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची दैनंदिन सोय कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अध्यक्ष अनिल गर्ग यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती देताना सांगितले, “वाहतूक पोलिसांकडून शाळा बस चालकांवर अकारण दंडात्मक कारवाई केली जाते. सीसीटीव्ही, वेबरेडर, जीपीएससारख्या सुविधा बसमध्ये असूनही ई-चालानद्वारे दंड आकारला जातो. याशिवाय आवश्यक परवानग्या मिळवतानाही अडथळे निर्माण होतात. हे सर्व आर्थिकदृष्ट्या असह्य झाले आहे.”
असोसिएशनने पुढील चार प्रमुख मागण्या सरकारपुढे मांडल्या आहेत:
* अकारण दंडात्मक कारवाईला आळा
* सीसीटीव्ही व जीपीएसबाबत स्पष्ट धोरण
* परवाने मिळवण्यासाठी सुलभ प्रक्रिया
* वाहतूक पोलिसांच्या हस्तक्षेपावर नियंत्रण
गर्ग पुढे म्हणाले, “आम्हाला सेवा थांबवायची इच्छा नाही, पण उद्भवलेल्या अडचणींमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. मुख्यमंत्री आणि वाहतूक मंत्र्यांनी त्वरित हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, हीच आमची अपेक्षा आहे.
या संपामुळे शाळा प्रशासनही अडचणीत आले असून, अनेक शाळांनी पर्यायी वाहतुकीसाठी पालकांना सूचित करण्यास सुरुवात केली आहे. उद्यापासून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणात मोठा व्यत्यय येण्याची शक्यता असल्याने, सर्व स्तरांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.


