
मुंबई प्रतिनिधी
राजकारणाच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात सध्या मोठ्या घडामोडी पाहायला मिळत असतानाच, येत्या काळात मुंबईच्या राजकीय पटावर नवे चित्र उभे राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं संभाव्य एकत्र येणं अखेर मराठीच्या मुद्द्यावर प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
हिंदी भाषा सक्तीच्या आदेशाला मराठी जनतेनं जसा विरोध केला, तसाच ठाम पवित्रा ठाकरे बंधूंनीही घेतला. त्यांच्या आक्रमक आंदोलनानंतर सरकारला अखेर नमते घेऊन दोन्ही अध्यादेश मागे घ्यावे लागले. याच लढ्याच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित विजयी मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
५ जुलै रोजी ‘विजयी मेळावा’; सर्वांना खुलं निमंत्रण
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तरित्या कार्यकर्त्यांना आणि मराठी जनतेला एका विशेष निमंत्रणपत्राद्वारे आवाहन केलं आहे. येत्या ५ जुलै रोजी वरळी येथील एन.एस.सी.आय. डोममध्ये सकाळी हा भव्य मेळावा पार पडणार आहे.
या निमंत्रणपत्रात स्पष्ट शब्दांत म्हटलं आहे :
“आवाज मराठीचा!
मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो,
सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…!
कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं!
आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो.
त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत.
बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे.
वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या!
आम्ही वाट बघतोय …!”
या निमंत्रणात उत्सवाचा सूर आहे, पण त्याहीपेक्षा मराठी अस्मितेचा आवाज अधिक ठळक आहे. ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात मराठीचा विजय साजरा करण्याची ही ऐतिहासिक संधी असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
राजकीय पुढचं पाऊल?
हा मेळावा केवळ यश साजरा करण्यापुरता मर्यादित राहतो की येथून ठाकरे बंधू एकत्रित राजकीय प्रवासाची नांदी करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. एक मात्र स्पष्ट — मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर हे दोन बंधू पुन्हा एकत्र दिसणार आहेत.