मुंबई प्रतिनिधी
राज्यात विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेच्या नावाखाली हिंदी लादली जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात त्यांनी थेट मोर्चाची हाक दिली असून, ६ जुलै रोजी गिरगावहून आझाद मैदानाकडे ‘मराठी माणसाचा भव्य मोर्चा’ निघणार असल्याचे जाहीर केले.
या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली, मात्र ती निष्फळ ठरल्याचे स्पष्ट करत, राज ठाकरेंनी सरकारच्या भूमिकेला स्पष्ट शब्दांत विरोध दर्शवला.
पत्रकार परिषदेत त्यांनी ठसठशीत १० मुद्द्यांतून सरकारवर घणाघात केला आणि मोर्चात सर्वपक्षीय सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनाही या मोर्चाचे निमंत्रण दिले गेले आहे.
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले १० ठळक मुद्दे:
1. सरकारची भूमिका फेटाळली:
शिक्षणमंत्री भेटून गेले, मात्र त्यांची भूमिका मला मान्य नाही. मी स्पष्ट सांगितले – हे आम्हाला चालणार नाही.
2. NEP आणि सीबीएसईवर सवाल:
NEP मध्ये पाचवीनंतर पर्यायी भाषेचा उल्लेख आहे. सीबीएसई शाळांमधून हिंदीची सक्ती का? बाकी राज्ये हे करत नाहीत, महाराष्ट्रातच असा हट्ट का?
3. हिंदीसकट कोणत्याही भाषेची सक्ती मान्य नाही:
हिंदीसह कुठल्याही भाषेची सक्ती केली गेली तर आम्ही कायम विरोधात राहणार.
4. ६ जुलैला कोणताही झेंडा नसलेला मोर्चा:
सकाळी १० वाजता गिरगाववरून निघणारा मोर्चा हा ‘मराठी माणसाचा’ असेल. सर्व पक्षांना आणि सर्व मराठीजनांना आमंत्रण.
5. मराठी भाषा आणि अस्मितेवर घाला:
ही योजना महाराष्ट्राच्या मराठीपणावर घाला घालणारी आहे. त्यामुळेच मी याला ‘कट’ म्हणतो.
6. कोण येतो आणि कोण चुकवतो ते पाहायचं:
ही महाराष्ट्राची लढाई आहे. कोण सहभागी होतो आणि कोण दूर राहतो ते मी पाहणार आहे.
7. उद्धव ठाकरेंसह सर्वांना निमंत्रण:
सर्व राजकीय पक्षांशी संवाद सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांनाही मोर्चासाठी आमंत्रण दिलं आहे.
8. रविवारचा दिवस मुद्दाम निवडला:
रविवारी मोर्चा असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला सहभागी होता येईल. गिरगाव ते आझाद मैदान अशी रूट आहे.
9. कलाकारही पुढे येतील का? प्रश्न अनुत्तरित:
मोठमोठ्या प्रश्नांवर भाषेचाच मुद्दा का समोर आणला जातोय? कलाकारांचा सहभाग लक्षात घ्यायचा आहे.
10. जेएनपीटीच्या नियुक्त्यांवर संशय:
जेएनपीटीत पदं रिक्त असताना मुलाखती अदानी पोर्टला का घेतल्या जात आहेत? याचा खुलासा हवा.
६ जुलैचा मोर्चा आता केवळ मराठी भाषेचा मुद्दा राहिलेला नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेची चळवळ ठरणार आहे. राज ठाकरेंच्या या हाकेला किती जनसमर्थन मिळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


