
मुंबई प्रतिनिधी
दुचाकीस्वारांसाठी राष्ट्रीय महामार्गांवरील टोल माफ असलेली व्यवस्था लवकरच बंद होणार का, असा प्रश्न गुरुवारी सकाळपासून देशभरात चर्चेचा विषय ठरला. १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनधारकांकडूनही टोल वसूल केला जाणार असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या समाज माध्यमांवर वाऱ्यासारख्या पसरल्या आणि दुचाकीस्वारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला.
या अफवेमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. नागरिकांमध्ये नाराजीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, यासंदर्भात केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नव्हती. विविध माध्यमांतून समोर आलेल्या अशा अपुऱ्या आणि अप्रामाणिक बातम्यांमुळे जनमानसात संभ्रम निर्माण झाला होता.
दरम्यान, याबाबतची स्पष्टता स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्यांनी गुरुवारी दुपारी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून एक पोस्ट शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला.
📢 महत्वपूर्ण
कुछ मीडिया हाऊसेस द्वारा दो-पहिया (Two wheeler) वाहनों पर टोल टैक्स लगाए जाने की भ्रामक खबरें फैलाई जा रही है। ऐसा कोई निर्णय प्रस्तावित नहीं हैं। दो-पहिया वाहन के टोल पर पूरी तरह से छूट जारी रहेगी। बिना सच्चाई जाने भ्रामक खबरें फैलाकर सनसनी निर्माण करना स्वस्थ…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 26, 2025
“काही माध्यमे दुचाकी वाहनांवर टोल लावण्याबाबत दिशाभूल करणारे वृत्त पसरवत आहेत. दुचाकी वाहनांना टोल लावण्याचा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही. दुचाकी वाहनांना टोलमधून पूर्णपणे सूट असणार आहे,” अशी ठाम भूमिका गडकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये मांडली.
तसेच, अशा प्रकारच्या अपुऱ्या माहितीवर आधारित खळबळजनक बातम्या पसरवणाऱ्या माध्यमांचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
या स्पष्टीकरणानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, सध्या तरी दुचाकीस्वारांना टोल भरण्याची गरज नाही, हे अधिकृतरित्या स्पष्ट झाले आहे. त्यामुळे व्हायरल झालेल्या बातम्यांना केवळ अफवा ठरवत, गडकरींच्या वक्तव्यानं दुचाकीस्वारांच्या चिंतेवर कायमचा पूर्णविराम दिला आहे.