
जळगाव प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाजप आणि महायुती सरकारवर केलेल्या टिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात परखड उत्तर दिले आहे. “बोलबच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही,” असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेची संभाव्य झळ थोपवली.
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (१९ जून) पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त भाजपवर हल्ला चढवला होता. “मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडेतिकडे गाठीभेटी घेत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर निशाणा साधला होता. त्याचबरोबर, “जर तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही महाराष्ट्रावरून तुमचे नामोनिशाण पुसून टाकू,” असा इशाराही त्यांनी दिला होता.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “बोलबच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही.” जळगाव दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी संवाद साधत होते.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरही फडणवीसांना विचारण्यात आले. मात्र, “खडसेंच्या भेटीबाबत मला काही माहिती नाही,” असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलणे टाळले.
फडणवीस जळगाव जिल्ह्यात क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. “आदिवासी स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा गौरव होणे आवश्यक आहे. खाज्याजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध जोरदार लढा दिला होता. त्यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी पुन्हा येथे येण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे,” असेही त्यांनी सांगितले.