
परभणी प्रतिनिधी
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या श्रीक्षेत्र आळंदीतील मंदिराच्या गाभाऱ्यास आता चांदीचा भव्य दरवाजा लाभला आहे. हे दान कुणा उद्योगपतीकडून नाही, तर परभणीतील सेवाभावी डॉक्टर दांपत्याकडून,प्रख्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम मसलेकर आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मजा मसलेकर यांच्या हस्ते हे अद्वितीय दान मंदिराला अर्पण करण्यात आलं.
डॉ. श्रीराम मसलेकर यांच्या १ मार्च रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त, त्यांनी आळंदी परिसरातील सेवेकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं. परभणीतून औषधं, मलमं, टॉनिक, कॅल्शियम गोळ्या आदी साहित्य मोठ्या प्रमाणात घेऊन गेलेल्या मसलेकर दांपत्याने सुमारे २२० रुग्णांची तपासणी केली. महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर त्यांच्या मनात एक दिव्य प्रेरणा उमटली,माऊलींच्या मंदिरासाठी काहीतरी विशेष अर्पण करण्याची.
हीच प्रेरणा पुढे आकार घेत गेली आणि मंदिर समितीच्या परवानगीने अवघ्या चार महिन्यांत चांदीचा दरवाजा तयार करण्यात आला. सागवानी लाकडावर ११ किलो वजनाच्या चांदीचा पत्रा चढवण्यात आला असून, त्यावर महाविष्णूची आयुधं,शंख, चक्र, गदा, पद्म,कोरली गेली आहेत. माउलींच्या पंढरपूर वारीच्या प्रस्थानाच्या आदल्याच दिवशी, अत्यंत मंगल मुहूर्तावर हा दरवाजा गाभाऱ्यात बसवण्यात आला.
या दानाबद्दल मंदिर समितीने डॉ. मसलेकर दांपत्याचा सन्मान केला. मुख्य ट्रस्टी योगी निरंजनदास आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
“गाभाऱ्यात उभं राहताना एक विलक्षण आध्यात्मिक अनुभूती आली. ती भावना इतकी तीव्र होती की लगेच कृतीत उतरवली. माउलींच्या वारीच्या पूर्वसंध्येला दरवाजा बसवण्याचा योग जुळून आला, ही बाबच अनमोल,” असं समाधान व्यक्त करताना डॉ. श्रीराम मसलेकर भावुक झाले.
“दरवाजा ही केवळ एक वस्तू नसून, माउलींप्रती असलेल्या भक्तीचं प्रतीक आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलो, तरी अध्यात्माशी जोडलेलं काहीतरी करणं आवश्यक वाटत होतं,” असं म्हणत डॉ. पद्मजा मसलेकर यांनी श्रद्धेची ही सेवा मांडली.
हा दरवाजा केवळ चांदीचा नव्हे, तर भक्तिभावाने भारलेला आहे. मसलेकर दांपत्याचं हे कार्य सामाजिक बांधिलकी, वैद्यकीय सेवा आणि भक्ती यांचा उत्तम संगम साधणारा ठरला आहे. माउलींच्या चरणी ही अर्पण अजरामर ठरेल, यात शंका नाही!