मुंबई प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, आगामी महिन्यांत महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुका पार पडणार आहेत. गेली तीन-चार वर्षं रखडलेल्या या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने आता निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. विशेषतः उद्धव ठाकरे गट आणि मनसेसाठी ही निवडणूक ‘अस्तित्वाची लढाई’ ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाचा जनाधार कमी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे यंदाची महापालिका निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
ठाकरे गटानं मोर्चेबांधणी सुरू केली
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आधीपासूनच जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मातोश्रीवर नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये विधानसभा क्षेत्रानुसार उपनेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नेत्यांना मतदारसंघनिहाय जबाबदारी सोपवण्यात आली असून, ते आपल्या भागात जाऊन आढावा बैठक, माजी नगरसेवक, शाखा प्रमुख व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधणार आहेत.
या नेत्यांवर सोपवण्यात आली जबाबदारी –
अमोल कीर्तीकर – दहिसर, बोरिवली, मागाठाणे
उद्धव कदम – चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
विलास पोतनीस – दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व
विश्वासराव नेरूरकर – वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम
रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम
गुरुनाथ खोत – चांदिवली, कलीना, कुर्ला
नितीन नांदगावकर – विक्रोळी, भांडुप, मुलुंड
सुबोध आचार्य – घाटकोपर पूर्व-पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द
मनोज जमसूतकर – अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
अरुण दूधवडकर – धारावी, माहीम, वडाळा
अशोक धात्रक – वरळी, दादर, शिवडी
सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी
राज्य सरकारकडून नुकताच प्रभाग पुनर्रचनेबाबतचा आदेश निघाल्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक तयारीला अधिक गती मिळाली आहे. यामुळे येत्या काळात मुंबईत निवडणूक वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.


