मुंबई प्रतिनिधी
तब्बल ३०,००० कोटी रुपयांचा खर्च झालेल्या मेट्रो अॅक्वा लाईन ३ प्रकल्पातून प्रवाशांच्या सोयीसाठी काहीही मिळत नसेल, तर असा प्रकल्प उभारण्याचा उद्देश काय, असा थेट सवाल आज सांताक्रूझ मेट्रो स्थानकाच्या पाहणीवेळी स्थानिक आमदार वरून सरदेसाई यांनी केला. स्थानकाच्या आसपासची दुर्दशा पाहून त्यांनी संताप व्यक्त करत संबंधित यंत्रणांना जाब विचारला.
पश्चिम द्रुतगती मार्गालगत असलेल्या सांताक्रूझ मेट्रो स्थानकाचे काम सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले. मात्र, आजही येथे प्रवाशांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. स्टेशनबाहेर ना रिक्षांची सोय आहे, ना टॅक्सीची. पादचारी मार्गांवर लोखंडी भंगार अडथळा ठरत आहे, परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था नाही, तसेच दिव्यांगांसाठी रॅम्पसुद्धा उपलब्ध नाही.
आज आमदार सरदेसाई यांनी स्थानिक नागरिक, शिवसैनिक आणि MMRCL अधिकाऱ्यांसोबत या स्थानकाची पाहणी केली. पाहणीदरम्यान आढळलेल्या बेफिकीरीमुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “ आमदार सरदेसाई यांनी मागील महिन्यात एमएमआरडीए आयुक्तांची भेट घेऊन या समस्या मांडल्या होत्या. मात्र, अद्याप काहीही बदल झालेला नाही. ही स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे,” असे ते म्हणाले.
“स्टेशनबाहेर पडल्यानंतर पुढे जायचे तरी कसे?” असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला असून, कोट्यवधी रुपये खर्चूनही जर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो, तर हा प्रकल्प नेमका कोणासाठी, असा रोष नागरिकांमध्ये पसरला आहे.
आमदार सरदेसाई पुढील आठवड्यात बीकेसी आणि वांद्रे मेट्रो स्थानकांची पाहणी करणार असून, त्यांच्याही समस्या पुढे आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


