
बिड प्रतिनिधी
बीड जिल्हा पोलीस दलातून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची बिघडती परिस्थिती आणि पोलीस यंत्रणेवरील वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या निर्णयाने बीडच्या पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मस्साजोग सरपंच हत्याकांडानंतर कारवाई –
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर बीड पोलीस यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास उडाला होता. जिल्ह्यात दिवसाढवळ्या होणारे अपहरण, दरोडे, मारहाणीच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासोबतच पोलीस खात्यावर सातत्याने होणारे आरोप आणि कामकाजावर उपस्थित होणाऱ्या शंका यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी हा कठोर निर्णय घेतला. बदली झालेल्या 606 कर्मचाऱ्यांमध्ये अंमलदारांचा समावेश आहे.
स्थानिक कर्मचाऱ्यांची दुसऱ्या तालुक्यात बदली –
पोलीस अधीक्षक कावंत यांनी बदल्यांचे धोरण कठोरपणे राबवले आहे. ज्या भागात पोलीस कर्मचारी राहतात, त्या भागातून त्यांची बदली दुसऱ्या तालुक्यात करण्यात आली आहे. यामुळे कोणत्याही प्रकारे गैरप्रकार किंवा चुकीचे काम होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलीस दलात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.