मुंबई प्रतिनिधी
मुंबई : उरी सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात घाटकोपरचा 23 वर्षीय जवान मुरली श्रीराम नाईक शहीद झाले आहेत. 9 मेच्या पहाटे 3:30 वाजता उरी, जम्मू-काश्मीर येथे पाकिस्तानच्या हल्ल्याचा मुकाबला करताना त्यांना वीरमरण आले. त्यांचं वीरमरण समजताच त्यांच्या मूळ गावी आणि मुंबईतील निवासस्थानी शोककळा पसरली आहे.
मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील सत्यसाई नगर जिल्ह्यातील कल्की तांडा, गोरंटला मंडळ येथील असून, त्यांच्या वडिलांनी कुटुंबासोबत मुंबईतील घाटकोपर परिसरात स्थलांतर केलं होतं. त्यांच्या वडिलांनी मजुरी करून मुलाला शिक्षण दिलं आणि सैन्यात भरती होण्यासाठी पाठिंबा दिला.
मुरली नाईक 2022 मध्ये भारतीय सेनेत दाखल झाले होते. नाशिकच्या देवळाली येथून त्यांची ट्रेनिंग झाली. त्यानंतर आसाम, पंजाब आणि सध्या जम्मू-काश्मीरमधील उरी येथे त्यांची तैनाती होती.
भारत-पाक संघर्ष तीव्र होत असताना, सीमेवर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. पूँछ आणि उरी सेक्टरमध्ये भारतीय जवान पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी सैन्याची दोन विमाने पाडली असून, त्यांचे हल्ले निष्फळ ठरवले आहेत.
जवान मुरली नाईक यांच्या वीरमरणाची बातमी गावात पोहोचताच त्यांच्या घरात आणि परिसरात शोकसागर उसळला. आईच्या अश्रूंनी अनेकांचे मन हेलावून टाकले. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी 10 मे रोजी सायंकाळी नेण्यात येणार आहे.
मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून श्रद्धांजली वाहिली असून, “त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व कुटुंबाला या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो,” अशी भावना व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील ट्विट करून शहीद जवानास श्रद्धांजली अर्पण केली आहे.


