स्वप्नील गाडे /वार्ताहर
मुंबई – सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावर चौघांनी मिळून थेट पोलीस ठाण्यातच हल्ला केला. विशेष म्हणजे, ही मारहाण थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवरही या चौघांनी हात उचलला. या घटनेत तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
रिझवान शेख असे मारहाण झालेल्या रिक्षाचालकाचे नाव असून तो सांताक्रूझ येथील गझरबांध परिसरात राहतो. शनिवारी दुपारी रिक्षा उभी करण्यावरून रिझवानचा काही स्थानिकांशी वाद झाला होता. हा वाद पुढे धक्काबुक्कीपर्यंत गेला, त्यामुळे रिझवानने तक्रार नोंदवण्यासाठी सांताक्रूझ पोलीस ठाणे गाठले.
मात्र, रिझवान पोलीस ठाण्यात गेल्याची माहिती मिळताच आशिष शर्मा, नरेश पाटील, दिव्येश ठाकूर आणि त्यांच्या आणखी एका साथीदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी थेट पोलीस ठाण्यात रिझवानवर हल्ला चढवला.
हा गोंधळ थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवरही चौघांनी हात उचलला. या हल्ल्यात सहायक निरीक्षक भूषण मोरे, उपनिरीक्षक साईनाथ पंतमवाड, तसेच हवालदार पर्वीण सुरवसे हे किरकोळ जखमी झाले.
या प्रकारामुळे पोलिस ठाण्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मुख्य आरोपी आशिष शर्मा आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे, मारहाण करणे आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.


