
नवी दिल्ली वृत्तसंस्था
जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात कटुता आली आहे, आधीच कटू असलेले संबंध आता विकोपाला गेले आहेत.
दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानचे माप आता भरले आहे. दहशतवादी कारवायांना बळ देत त्यांनी भारताविरोधी छुपे युद्धच सुरु ठेवलेले आहे. आता या पाकिस्तानला धडा शिकवावा अशी असंख्य भारतीयांची मागणी आहे.
अशातच पाकिस्तानवर भारत कधीही हल्ला करु शकतो अशी शक्यता पाकिस्तानच्या लोकांनाही वाटते. ते काळजीत पडले आहे, पाकिस्तानी प्रशासन तर हादरुन गेले आहे, त्यामुळेच की, काय आता पाक लष्करामध्ये मोठ्या हालचाली दिसून येत आहे. एवढेच नाहीतर एक मोठी बातमी आता समोर आली आहे.
काय आहे मोठी बातमी?
भारत हल्ला करु शकतो या भीतीने पाकिस्तानात दहशत आहे, यामुळेच पाकिस्तानी लष्कराकडून राजीनाम्यांचा वर्षाव होत आहे, जवळपास दोन दिवसांत सुमारे पाच हजार जवानांनी नोकरी सोडली आहे. भारत-पाक सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्करात राजीनाम्यांचा महापूर आला आहे.
पाकिस्तानी सैन्य भितीच्या छायेत
भारताने पाकिस्तानशी संबंधित अनेक धोरणांत बदल केला आहे, एलओसी अर्थात लाईन ऑफ कंट्रोल प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हालचाली वाढल्या आहेत, अटारी रि-ट्रीट कार्यक्रम लहान करण्यापासून पाकिस्तानच्या नागरिकांना पाकिस्तानात परतण्याचे दिलेले आदेश असो की, सिंधु जलकरार रद्द करण्याच्या हालचाली या पार्श्वभुमीवर पाकिस्तान सध्या चिंताग्रस्त आहे. त्यातच भारताने दहशतवाद्यांची घरं उडवत जोरदार मोहिम राबवली आहे. याची भिती पाकिस्तानी सैन्यातही आहे सध्या ते भितीच्या छायेत वावरत आहेत.
जीव वाचवण्यासाठी राजीनामे देत आहेत का?
प्राप्त माहितीनुसार, एलओसीवर भारत आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये वाढत्या तणावामुळे पाकिस्तानी लष्कराचे जवान आणि अधिकारी आपला जीव वाचवण्यासाठी राजीनामा देत आहेत असे वृत्त जागरणने दिले आहे, बहुतेक सैनिक आणि अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे तर काही मृत्यूच्या भीतीने नोकरी सोडत आहेत असे या वृत्तात म्हटले आहे.
दोन दिवसांत पाच हजार सैनिकांचे राजीनामे
गेल्या दोन दिवसांत पाकिस्तानी लष्करातील सुमारे पाच हजार सैनिक आणि अधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. आता हे अधिकारी आणि जवान आपापल्या घरी परतले आहेत, तर आणखी काहीजण राजीनामे देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेशावरस्थित पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल उमर बुखारी यांनी पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांना पत्र लिहिले असून, या पत्रात पश्चिम सीमेवर तैनात असलेल्या 12व्या कॉर्प्सची माहिती देण्यात आली आहे. या जवानांना राजीनामे देण्याचे थांबवावे या कृतीमुळे लष्करात वेगळा संदेश जात असून यामुळे इतर सैनिकांचे खच्चीकरण होऊ शकते असेही पत्रात म्हटले आहे.
काय आले कारण समोर?
नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या सैनिकांत राजीनामा देण्याचा ट्रेंड वाढत आहे. पत्रात लिहिले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बहुतांश कुटुंबे आपल्या मुलांना घरी बोलावत आहेत तर काही मृत्यूच्या भीतीने घरी परतत आहेत.
आमची मुलं मारली जाऊ शकतात!
पहलगाम हल्ल्यानंतर भीतीचे वातावरण असून नियंत्रण रेषेवर जर हल्ला झाला तर प्रत्युत्तर देण्यास भारतीय सैन्य कमकुवत ठरेल अशा स्थितीत पाकिस्तानी सैनिकांचे आणि अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवावे अशी मागणीही पत्रात आहे तर दुसरीकडे पाक लष्करातील सैनिक आणि अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आपल्या मुलांना घरी बोलवत आहे.