
बिड प्रतिनिधी
बिडमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने शिक्षकावर प्राणघातक हल्ला केला. ‘मला तुमची मुलगी द्या’, असं म्हणत या तरुणाने शिक्षकाच्या कारला आधी ट्रॅक्टरने धडक दिली. त्यानंतर कोयता आणि कुऱ्हाडीने त्यांच्यावर सपासप वार करत हल्ला केला.
या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाला. शिक्षकाच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा अन् संपूर्ण कपडे रक्ताने माखलेले होते. या शिक्षकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. आरोपींना पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा होऊ लागली आहे.
बाजीराव डोईफोडे यांचे सासरे महादेव घुमरे यांनी सांगितले की, ‘जखमी झालेली व्यक्ती माझे जावई आहेत. ते केजला राहत असताना आरोपी तरुण माझ्या नातीच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. त्याने तिला ब्लॅकमेल करण्यासाठी नको तसले फोटो काढून घेतले आणि तिला नेहमी ब्लॅकमेल करत राहिला. त्यानंतर ती मुलगी मलाच द्या असं म्हणत माझ्या जावयासोबत भांडत करत होता. तो सतत रस्ता आडवून माझ्या जावयाला धमक्या देत होता. त्यामुळे माझ्या जावयाने कार घेतली. जाण्या येण्यासाठी ड्रायव्हर ठेवला. रोज ते कारने ये-जा करत होते. आज या तरुणाने माझ्या जावयाच्या कारला ट्रॅक्टरने धडक दिली. त्यानंतर माझ्या जावयावर प्राणघातक हल्ला केला.’
‘आरोपीने माझ्या जावयाच्या कारचा दरवाजा पहारी तोडून त्यांच्यावर हल्ला केला. कुऱ्हाड आणि कोयत्याच्या सहाय्याने त्यांच्यावर वार करण्यात आले. जखमी झालेल्या आमच्या जावयाला आधी आम्ही सिव्हील रुग्णालयात नेले होते. त्यानंतर त्यांना लोटस या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या आधी आम्ही एसपीला, डीवाय एसपीला, तिथल्या पोलिसांना, शिवाजीनगर पोलिसांना १० वेळा जाऊन भेटलो. आम्ही याप्रकरणी आधी देखील १० वेळा पोलिस ठाण्यात गेलो. पोलिसांना वारंवार सांगितले की आम्हाला संरक्षण द्या. आम्ही मागणी करून सुद्धा पोलिसांनी काहीच लक्ष दिले नाही.
‘आता आम्ही एसपींना जाऊन भेटणार आहोत. त्यांना सविस्तर माहिती देणार आहोत. जर आरोपीविरोधात कारवाई झाली नाही तर आम्ही पेट्रोल-रॉकेल अंगावर टाकून जाळून घेणार आहोत. ऐवढाले गुंड बीडमध्ये हिंडतात त्यांच्यावर कसली कारवाई होत नाही. हे पोलिस डिपार्टमेंट आहे की काय हे आम्हाला कळत नाही? यामध्ये नेमका कुणाचा हात असतो हे देखील आम्हाला समजत नाही. आरोपीविरोधात एका तासात कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.’