सांगली प्रतिनिधी
सांगली : ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतानाही, त्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेले तालुका आरोग्याधिकारीच नियमित पाहणी करत नसल्याचे सांगली जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत समोर आले. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती ऋषिकेश लाड यांनी दिला.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधे, वैद्यकीय साधनसामग्री, रुग्णवाहिका तसेच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, या केंद्रांच्या कामकाजाचा नियमित आढावा घेण्याची जबाबदारी असलेल्या तालुका आरोग्याधिकाऱ्यांकडूनच अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे बैठकीत निदर्शनास आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांना नियमित भेटी देऊन रुग्णसेवा, उपलब्ध सुविधा, कर्मचाऱ्यांची उपस्थिती तसेच केंद्रातील अडचणींबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी केंद्रांना भेटी न देता अहवालही सादर केले नसल्याचे स्पष्ट झाले. याबाबत सभापती लाड यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत, कामकाजातील हलगर्जीपणा कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले.
दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच जन्म-मृत्यूच्या नोंदी नियमित ठेवणे आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या ११ आरोग्य केंद्रांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कराराचे नूतनीकरण करण्याबाबतही बैठकीत निर्देश देण्यात आले.
या बैठकीला आरोग्य समिती सदस्य अमित पाटील, डॉ. शिल्पा जिवाणावर, अक्षय पाटील, अरुणा पाटील, प्रतीक पाटील, मीना पाटील, सरदार पाटील, मंदा माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे उपस्थित होते.
बुधगावची जुनी उपकेंद्र इमारत अभ्यासिकेसाठी
मिरज तालुक्यातील बुधगाव येथील वापरात नसलेली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची जुनी इमारत विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या इमारतीत अभ्यासिका सुरू करण्यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना सभापती ऋषिकेश लाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


