सांगली प्रतिनिधी
सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील तिरमलवाडी-देशिंग परिसरात एका आईने आपल्या अवघ्या एक वर्षाच्या मुलीची कथितरित्या कात्रीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घरात कोणीही नसताना ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, चिमुकलीच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
मृत मुलीचे नाव श्रीशा महादेव क्षीरसागर (वय १ वर्ष) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीशाचे वडील महादेव क्षीरसागर हे सलूनचा व्यवसाय करतात. मंगळवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे दुकानात गेले होते. त्यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून आई अनिता महादेव क्षीरसागर (वय २६, रा. तिरमलवाडी) हिने घरातील कात्रीने मुलीवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.
या हल्ल्यात श्रीशाच्या मानेला आणि शरीरावर गंभीर वार झाले. गंभीर जखमांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने चिमुकलीचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. जन्मदाती आईकडूनच आपल्या एक वर्षाच्या मुलीची हत्या झाल्याच्या घटनेने तिरमलवाडी-देशिंग परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून श्रीशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला.
या प्रकरणात पोलिसांनी संशयित आई अनिता क्षीरसागर हिला ताब्यात घेतले असून, तिच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील सखोल तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत.


