विटे : प्रदीप जोशी
सांगली : आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर, विटा येथील आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाच्या (International Affairs Cell) वतीने विद्यार्थ्यांना युनायटेड किंगडम (UK) मधील उच्च शिक्षणाच्या संधी, विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धती आणि करिअरच्या विविध संधींची माहिती देण्यासाठी ‘International Pathways: Education and Opportunities in the UK’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
या चर्चासत्रासाठी ब्रिटनमधील मिशेल ब्राउन (संचालिका, आंतरराष्ट्रीय भरती प्रक्रिया, मँचेस्टर, ब्रिटन) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. तसेच अविनाश रामचंद्र वाघ (संचालक, प्रोफेशनल एज्युकेशनल कन्सल्टन्सी, पुणे), प्रशांत वंजारी (प्रदेश प्रमुख, इन्फिनिटी ग्रुप, महाराष्ट्र) आणि यामिनी मल्होत्रा (जनरल मॅनेजर, इन्फिनिटी ग्रुप, महाराष्ट्र) यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांनी ब्रिटनमधील उच्च शिक्षण संस्था, प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, शिष्यवृत्तीच्या संधी, शिक्षण पूर्ण केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधी तसेच जागतिक स्तरावर मिळणाऱ्या अनुभवांची सविस्तर माहिती दिली. परदेशात उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे चर्चासत्र उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरले.
या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सदाशिवराव (भाऊ) पाटील, अध्यक्ष ॲड. वैभव (दादा) पाटील, संचालक पी. टी. पाटील, संचालिका पूजा पाटील, आर्थिक संचालक रवीराज सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. महाजन आणि रजिस्ट्रार अजितसिंह चव्हाण यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाचे समन्वयक प्रा. आर. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या नव्या संधींची ओळख झाली असून, जागतिक स्तरावर शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगती करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळाली.


