नेवरी नाका ते शिवाजी चौकदरम्यान वाहतुकीचा बोजवारा |
विटा : प्रदीप जोशी
विटा शहराच्या वाहतुकीचा कणा असलेला कराड-विजापूर महामार्ग सध्या अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला असून, कृष्णलीला मंगल कार्यालय ते शिवाजी चौकदरम्यान वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना थाटलेली दुकाने, सार्वजनिक जागेवरील पत्र्याचे शेड, बेशिस्त पार्किंग आणि वाढती वाहनांची गर्दी यामुळे रस्त्याची उपलब्ध रुंदी कमी झाली आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नाही, तर वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या सहा महिन्यांत अतिक्रमणांमध्ये झालेली वाढ पाहता, प्रशासन मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करीत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विटा शहरातून जाणाऱ्या या महामार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. विटा हायस्कूल ते शहा पेट्रोल पंप परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकाने आणि व्यावसायिक अतिक्रमणांचा विळखा वाढला आहे. नेवरी नाका ते शिवाजी चौकदरम्यान बेशिस्त पार्किंगमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी, नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरून चालणेही धोकादायक बनले आहे. किरकोळ अपघातांच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी वाढत आहे.
मायणी-तासगाव रस्त्याचे रुंदीकरण; मग कराड रस्त्याचे काय?
मायणी-तासगाव रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रुंदीकरण करण्यात आले. मात्र, या परिसरातील काही विक्रेत्यांनी कराड रस्त्यावर व्यवसाय थाटल्याने एका रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडवताना दुसऱ्या मार्गाची कोंडी वाढल्याचे चित्र आहे. शहरातील वाहतूक नियोजन करताना केवळ एका रस्त्याचा विचार न करता संपूर्ण शहराचा आराखडा तयार करण्याची गरज आहे. मग कराड-विजापूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे घोडे नेमके कुठे अडले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
फ्लायओव्हर आणि रिंगरोडच्या घोषणा हवेतच!
नेवरी नाका ते खानापूर नाका या दरम्यान उड्डाणपूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरही तो रद्द झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. काही व्यापाऱ्यांच्या हितसंबंधांमुळे हा निर्णय झाल्याचा आरोपही केला जात आहे. मात्र, याबाबतची वस्तुस्थिती प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. शहराच्या भविष्यातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रिंगरोड, फ्लायओव्हर आणि महामार्गाचे रुंदीकरण याबाबत ठोस निर्णय होणे गरजेचे आहे.
आमदार सुहास बाबर आणि उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी या प्रश्नात लक्ष घालून अतिक्रमणमुक्त महामार्गासाठी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. विकासकामांच्या घोषणा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची वेळ आता आली आहे.
उपजिल्हा रुग्णालय होणार; पण रुग्णवाहिकांना रस्ता मिळणार का?
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागी सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची योजना असताना परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. भविष्यात रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळ्याविना ये-जा करता यावी, यासाठी आतापासूनच नियोजन आवश्यक आहे. सार्वजनिक जागेवर उभारलेली पत्र्याची शेड आणि व्यावसायिक अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा करणे गरजेचे आहे. अन्यथा रुग्णालय उभारल्यानंतरही वाहतूक कोंडीचा प्रश्न रुग्णांच्या जीवावर बेतू शकतो.
आता आश्वासने नकोत, अतिक्रमणांवर थेट कारवाई हवी!
कराड-विजापूर महामार्गाचे नियोजनबद्ध रुंदीकरण, रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक, पदपथांची निर्मिती, पार्किंगचे नियोजन आणि आवश्यक ठिकाणी उड्डाणपुलाची व्यवहार्यता तपासणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज आहे. नेवरी नाका ते खानापूर नाका या मार्गाचे सर्वेक्षण करून रस्त्याला अडथळा ठरणारी अतिक्रमणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हटवावीत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रश्नावर विविध संघटना एकत्र येऊन आंदोलनाची दिशा ठरविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाने आंदोलनाची वेळ येण्यापूर्वीच ठोस पावले उचलावीत. कारण सार्वजनिक रस्ते हे कोणत्याही व्यक्तीच्या किंवा व्यापाऱ्याच्या खासगी मालकीचे नसून सर्वसामान्य नागरिकांच्या वापरासाठी आहेत.
मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? रस्त्यावरील वाढती अतिक्रमणे, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका याकडे आणखी किती दिवस दुर्लक्ष करणार? विटा शहराच्या विकासाच्या गप्पा मारताना शहराच्या वाहतुकीचा कणा असलेल्या कराड-विजापूर महामार्गाला मोकळा श्वास देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने स्वीकारली पाहिजे. अन्यथा नागरिकांचा वाढता असंतोष आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.


