सांगली : प्रदीप जोशी
आटपाडी : प्रस्थापितांचा तीव्र विरोध आणि अनेक राजकीय डावपेचांना तोंड देत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवडून आलो आहे. आता ही बँक मुठभर पुढाऱ्यांची राहणार नसून सामान्य शेतकरी आणि तरुणांच्या हितासाठी काम करणारी असेल, असा निर्धार आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल झरे (ता. आटपाडी) येथील मारुती मंदिर चौकात सर्व सहकारी आणि झरे पंचक्रोशीच्या वतीने पडळकर यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पडळकर म्हणाले की, प्रस्थापितांचे सर्व डावपेच उधळून लावत आपण ही निवडणूक लढवली. जत तालुक्यातील स्वाभिमानी मतदारांनी मोठ्या मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. सहकाराच्या नावाखाली वर्षानुवर्षे स्वतःचे हित साधणाऱ्या मंडळींनी आटपाडी, नागेवाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, महांकाली, जतचा राजे डफळे आणि सर्वोदय यांसारखे साखर कारखाने तसेच आटपाडी व विटा येथील सूतगिरण्या बंद पाडून त्या कवडीमोल भावात घशात घातल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हा बँकेच्या ११ हजार कोटी रुपयांच्या ठेवींपैकी ३५०० कोटी रुपये केवळ कारखान्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रिकाम्या गोदामांच्या आधारे साखरेच्या नावाखाली १०० कोटी रुपयांची कर्जे उचलण्यात आली, तर बनावट सोने तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा दावाही त्यांनी केला. नवीन संचालक मंडळ निवडून आलेले असतानाही जुन्या संचालकांनी घाईघाईने बैठक घेऊन २८५ कोटी रुपयांच्या कर्जाचा घाट घातल्याचा आरोप करत, बँकेतील हा कथित गैरकारभार रोखण्यासाठीच आपण चाबूक घेऊन बँकेत प्रवेश केल्याचे पडळकर म्हणाले.
जिल्हा बँकेकडून स्वतःला एक रुपयाचेही कर्ज घ्यायचे नाही, तसेच बँकेचा भत्ता किंवा चहाही घ्यायचा नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. राजकीय शिफारस नसलेल्या सामान्य शेतकऱ्यांना आणि तरुणांना न्याय मिळावा यासाठी स्वतःच्या खर्चाने बँकेत स्वतंत्र जनसंपर्क कार्यालय सुरू करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
बँकेने ठरावीक कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची मदत करण्याऐवजी जिल्ह्यातील होतकरू तरुणांना उद्योग उभारणीसाठी १० ते ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. सांगलीत शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना दरमहा एक हजार रुपये खोलीभाडे द्यावे, तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० ते १५ हजार रुपयांची वाढ करावी, या बाबी आपला प्रमुख अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे काळेवाडी येथील बुद्ध विहार, कुरुंदवाडी व झरे येथील घाट, खरसुंडी येथील सिद्धनाथ देवस्थान, घोडेखोरा आणि वाकसेवाडी रस्ता यांसारखी कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण करता आली, असेही पडळकर यांनी नमूद केले. तसेच १५ तारखेपासून सुरू होणाऱ्या टेंभू योजनेच्या आवर्तनातील पाण्याचा दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दादासाहेब हुबाले, ज्येष्ठ नेते चवरे , जिल्हा परिषद सदस्य माधवी वहिनी पडळकर, आटपाडीचे नगराध्यक्ष यू. टी. जाधव , बंडू शेठ, वैशाली वहिनी कातुरे, दादासाहेब मोटे , सरपंच अंकुश पाटील हवालदार, महादेव पाटील, विष्णुपंत, विलास काका, बाबाजी पाटील, शंकर माने, सुळे सर, चंदू काळे, चंदू दौंडे , दिलीप बुवा खिलारी, गोरे आणि राजमाने यांच्यासह झरे पंचक्रोशीतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


