सांगली प्रतिनिधी
मिरज (जि. सांगली) : रेल्वेत लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेचा लैंगिक छळ, जातिवाचक अपमान तसेच बदलीची धमकी दिल्याच्या आरोपावरून मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात रेल्वेच्या दोन अभियंत्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि विनयभंगासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीपकुमार शंभू शरण मिश्रा (वय ५३, रा. सुंदरनगर, मिरज) आणि युवराज स्वामी (वय ४५, सी अँड डब्ल्यू कार्यालय, मिरज रेल्वे स्थानक) अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
पीडित महिला कार्यालयीन कामकाज करत असताना दोन्ही अधिकाऱ्यांकडून लैंगिक स्वरूपाच्या टिपण्या तसेच गैरवर्तन केले जात असल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. यासंदर्भात तिने रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. तक्रारीची चौकशी झाल्यानंतर एका अधिकाऱ्याची पुणे येथे बदली करण्यात आली, तर संबंधित महिलेची फिल्डवर नेमणूक करण्यात आली.
फिल्डवर काम करत असताना तेथील इन्चार्ज संदीपकुमार मिश्रा यांनी जातिवाचक अपमान केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच, युवराज स्वामी यांनी, ‘तुझ्या तक्रारीमुळे एका अधिकाऱ्याची बदली झाली आहे. आमचे ऐकले नाहीस तर तुझी बदली बिनपाण्याच्या गावी करीन,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
२६ नोव्हेंबर २०२५ पासून कार्यालय तसेच फिल्डवर आपला छळ सुरू असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराला कंटाळून तिने वरिष्ठ रेल्वे अधिकारी तसेच राज्य महिला आयोगाकडेही तक्रारी केल्या. मात्र, अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप करत अखेर तिने मिरज रेल्वे पोलिसांत धाव घेतली.
महिलेच्या तक्रारीवरून संदीपकुमार मिश्रा आणि युवराज स्वामी यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी, विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सोलापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.

