नवी मुंबई, प्रतिनिधी
नवी मुंबई : “पोटात दुखतंय मम्मी…” असं म्हणत साडेतीन वर्षांची चिमुकली घरी आली आणि तिने सांगितलेल्या प्रकाराने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. कामोठे परिसरात शाळेतून स्कूलबसने घरी जाणाऱ्या चिमुकलीवर स्कूलबस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्को आरगुम यादव (३०) असे ताब्यात घेतलेल्या स्कूलबस चालकाचे नाव आहे. पीडित चिमुकली कामोठे सेक्टर ३६ येथील शाळेत शिकते. २ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर ती स्कूलबसने घरी जात होती. याच प्रवासादरम्यान चालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घरी पोहोचल्यानंतर चिमुकलीने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. चिमुकलीने या प्रकारानंतर पोटात दुखत असल्याचेही सांगितल्याने कुटुंबीय हादरून गेले.
तक्रारीनंतर कामोठे पोलिसांनी स्कूलबस चालकाविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पीडित चिमुकलीचा जबाब, वैद्यकीय तपासणी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्कूलबस चालकावरच असा गंभीर आरोप झाल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्कूलबस चालकांची नियुक्ती करताना त्यांची पार्श्वभूमी आणि चारित्र्य पडताळणी कितपत केली जाते, तसेच लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना आहेत का, असा सवाल या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

